52 लाखांचे सरकारी धान्य वॉचमनने गिळले; धान्यासह फरार आरोपीचा शोध सुरू

धसई केंद्रातील गोडाऊनमधील तब्बल 2 हजार क्विंटल भात लंपास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य सरकारच्या आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या भातावर डल्ला मारला असून गोडाऊनमधील 52 लाखांचे सरकारी धान्य रखवालदाराने गिळले असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी धान्यासह फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.

आदिवासी विकास महामंडळाचा कार्यक्षेत्रातील हमीभाव धान्य घोटाळ्याची मालिका कायम सुरू आहे. मुरबाड येथील न्याहाडी, चरीव केंद्रांतर्गत येत असलेल्या धसई केंद्रात हजारो क्विंटल भात गायब झाल्याने खळबळ उडाली. हा घोटाळा मार्च महिन्यापासून सुरू असून हजारो क्विंटल भाताची तूट होत असल्याचे समोर आल्यानंतर महामंडळातील अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली. मिलर आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हजारो क्विंटल भात गायब झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान गोडाऊनमधील आवक जावक अधिकाऱ्यांनी तपासली असता 52 लाखांचा 2 हजार क्विंटल भात गायब असल्याचे आढळून आले. हा संपूर्ण प्रकार गोडाऊनचा रखवालदार अच्युत वाळकोळी यांनी केला असल्याचे उघडकीस आले आल्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सागर सोनवणे यांनी टोकावडे पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

सुट्टीच्या दिवशी गोडाऊन उघडे दिसले

महामंडळाचे संचालक मधुकर काटे जुन्नरकडे जात असताना सुट्टीच्या दिवशी गोडाऊन उघडे दिसले. दरम्यान गोडाऊनमधला भात एका टेम्पोमध्ये भरला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद करून महामंडळाचे इतर संचालक व व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान भरपावसातील हा गफला चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान याप्रकरणी कठोर पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे