पाच दिवस स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी…ही आहे योजना…

20918
gold

केंद्र सरकारने बाजारभावापेक्षा स्वस्तात सोनेखरेदीची संधी जनतेला दिली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) या योजनेद्वारे बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने आणली आहे. ही योजना फक्त पाच दिवस राहणार आहे. म्हणजे स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी फक्त पाच दिवस मिळणार आहे. सोमवारपासून ही योजना सुरू झाली आहे. या योजनेत गुतंवणूक केल्यास आयकरातही सूट मिळणार आहे. 10 जुलै ही या योजनेची शेवटची तारीख आहे.

सोन्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारकडून सॉवरेन गोल्ड बॉन्डची सुरुवात केली आहे. 2020-21 या वर्षात सरकारने आणलेली ही चौथी योजना आहे. या योजनेत 4,852 रुपये प्रतिग्रॅम या दराने सोने खरेदी करता येणार आहे. म्हणजे 10 ग्रॅमसाठी 48,520 रुपये मोजावे लागणार आहेत. गोल्ड बॉन्ड ऑनलाईन पद्धतीने खरेदी केल्यास गुतंवणूकदारांना 50 रुपये प्रतिग्रॅमची सूट मिळणार आहे. म्हणजे ऑनलाईनद्वारे खरेदी केल्यास 4,802 रुपये प्रतिग्रॅम या दराने सोने खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकारकडून रिझर्व्ह बँकेने हे गोल्ड बॉन्ड जारी केले आहेत. हे गोल्ड बॉन्ड बँक, पोस्ट ऑफीस,एएसई, बीएसई,स्टॉ होल्डिंग कॉर्पोरेशन या ठिकाणाहून खरेदी करता येणार आहेत. तसेच ऑनलाईन खरेदीचा पर्यायही उपलब्ध आहे.

या बॉन्डची मुदत ( मॅच्युरिटी पिरीयड) आठ वर्षे आहे. तसेच यावर 2.5 टक्के प्रतिवर्ष व्याज मिळणार आहे. बॉन्डवर मिळणारे व्याज करश्रेणीनुसार करपात्र आहे. मात्र, या रकमेवर टीडीएस कापला जात नाही. तसेच आयकरात या गुतंवणुकीवर सूटही मिळते. अर्थसंकल्पात सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. तसेच जागतिक पातळीवर असलेल्या आर्थिक संकटामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात आहेत. त्यामुळे सुरक्षित गुतवणूक म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे सरकारने आणलेले हे गोल्ड बॉन्ड गुतंवणुकीसाठी चांगला पर्याय असल्याचे मानले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या