सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष, मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल; शरद पवार यांचा इशारा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. तरीही राज्य शासन गंभीर नाही. दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाय करा, अन्यथा राज्यातील जनतेसाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा दिला आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये दुष्काळाचे वास्तव मांडले आहे. दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱयाची कमतरता निर्माणझाली आहे. या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य शासनाकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही, असे शरद पवार यांनी नमूद केले आहे.

मागील महिन्यात पत्रकार परिषद घेऊन आपण राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनीही छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता, परंतु त्या महत्त्वपूर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. त्याची योग्य ती दखल सरकारने घेतली असेलच, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. दुष्काळ वाढत असतानाही सरकार अद्याप अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही, अशी खंतही शरद पवार यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

टँकर्सची मागणी 11 हजारांवर

आज टँकर्सची  संख्या 11 हजारांवर गेली असून आता टँकर्सवाल्यांनाही पाणी भरण्याचे स्रोत शोधावे लागत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून शासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

धरणे आटली, मराठवाडा होरपळतोय

दुष्काळाबाबत शरद पवार यांनी या पत्रात पुढे सविस्तरपणे मांडले आहे. उजनी, जायकवाडीसारखी महत्त्वाची धरणे आटली आहेत. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर, नगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिह्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुणे जिह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिह्यातील जत, आटपाडी या तालुक्यातील पाणीटंचाईची परिस्थिती अधिक चिंताजनक आहे, याकडेही शरद पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

 दुष्काळाने अस्वस्थ झालोय

दुष्काळी परिस्थिती हाताळताना आपण सरकारशी सातत्याने सहकार्याची भूमिका घेत आलो आहोत, परंतु या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झालेय. माणसे, जनावरे पाण्यासाठी तहानलीत. तातडीने पावले उचला.