
हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना आज सरकारकडून उत्तरे देण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी विरोधकांच्या शंकांचे निरसन केले. काँग्रेसचे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या परराष्ट्र व्यवहारांवरील स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जवळपास 2 तास ही बैठक चालली. पाकिस्तानकडून अणु युद्धाचे संकेत मिळाले होते का, या पहिल्याच प्रश्नाला असे कोणतेही संकेत मिळाले नव्हते, असे उत्तर मिसरी यांनी दिले. दरम्यान, यावेळी विरोधकांनी एकजुटीने परराष्ट्र सचिवांना ट्रोलिंग करण्याप्रकरणी जोरदार निषेध नोंदवला.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील संघर्षात युध्दविरामासाठी तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप झाला होता का, असा प्रश्न विचारला असता शस्त्रसंधी करार द्वीपक्षीय होता, त्यात अमेरिकेचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नव्हता, असे मिसरी म्हणाले. विरोधकांच्या वतीने बैठकीला तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि दिकेंद्र हुडा, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, भाजपच्या अपराजिता सारंगी आणि अरुण गोविल यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.