कोरोनाचा 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लावा; केंद्राची राज्यांना सूचना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे घातलेले थैमान लक्षात घेता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकाराने कोरोनाचे संक्रमण जास्त असलेल्या राज्यांसोबत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लावण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना केल्या आहेत. तसेच या जिल्ह्यांमध्ये गर्दी होणार नाही आणि निर्बंध पाळले जातील याची काळजी घेण्यात यावी, असेही केंद्राने म्हटले आहे.

देशातील 10 राज्यांमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे. त्या राज्यांसोबत केंद्राने आढावा बैठक घेतली. त्यात या सूचना करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे याबाबत गांभार्याने पावले उचलण्याचे गरज आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी या जिल्ह्यांध्ये अधिक कठोर निर्बंध लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी गर्दी टाळणे आणि कोरोना निर्बंधांचे पालन करणे गरजेचे आहे. याकडे लक्ष दिले नाही तर कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणीपूर या राज्यांमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे. या राज्यांसोबत केंद्राने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राज्यांना सूचना केल्या आहेत.

कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्याच्या सूचनाही केंद्राने केल्या आहेत. तसेच आजारी आणि कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्यांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात प्राथमिकता देण्यात यावी, असेही केंद्राने म्हटले आहे. गृह विलगीकरणात असलेल्यांवर देखरेख ठेवण्याच्या सूचनाही केंद्राने केल्या आहेत. अशा रुग्णांपासून संक्रमण पसरणार नाही. तसेच त्यांना असलेल्या वैद्यकीय मदतीकडे लक्ष ठेवावे, असेही केंद्राने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या