धनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन

24

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

धनगर समाजाला आरक्षण देण्याचे वचन दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिले होते. कायदेशीर अडचणीमुळे त्याला वेळ लागला आहे पण येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या समाजाला न्याय देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक निर्णय जाहीर करतील असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिले आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी आलेल्या मेहता यांनी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, पांडुरंग कारखान्याचे संचालक दिलीप चव्हाण उपस्थित होते.

सत्ता आल्यानंतर पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा भाजपाने केली होती. परंतु साडे चार वर्षात ही मागणी मान्य न केल्यामुळे धनगर समाजात आज मोठा असंतोष असून याचा निवडणुकीमध्ये फटका बसणार का असा प्रश्‍न पत्रकारांनी प्रकाश मेहता यांना केला. त्यावर ‘धनगर आरक्षण बाबत स्वतः अटलबिहारी वाजपेयी यांनी पंढरीत येऊन घोषणा केली होती. त्यामुळे आरक्षण देण्यावर आम्ही ठाम आहोत. परंतू दिलेले हे आरक्षण कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात धनगर समाजातील प्रमुख नेत्यांशी निर्णायक चर्चा झाली असून लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण देण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत’, असे मेहता यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या