प्रयोगशाळेतील संशोधन शेतात पोहोचवा! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कृषि संशोधकांना आवाहन

285

विद्यापीठांमध्ये चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण झाल्याने प्रयोगशाळेत शोध लावले जात आहेत, संशोधन होत आहे याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी होण्याकरिता हे संशोधन शेतापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कृषि संशोधकांना आज केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या 38व्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. संजय सावंत, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. खांदेतोड उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, हिंदुस्थान स्वतंत्र झाला तेव्हा हिंदुस्थानच्या सर्वसाधारण विकास दरात कृषी क्षेत्राचा वाटा 50 टक्के होता तो आता घटून 14 टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली त्या वेळी राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा असणारा 28 टक्के वाटा घटून आता तो 12 टक्क्यांवर आला आहे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. हिंदुस्थान हा कृषीप्रधान देश आहे. देशात आजही पन्नास टक्के वर्ग शेतमजुरी व नोकरीच्या क्षेत्रात आहे. यावेळी कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत तसेच विद्यापीठाचा दर्जा सुधारण्याबाबत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या