गोवंडीत ४०० विद्यार्थ्यांना भीतीची बाधा, पालकांची रुग्णालयात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

औषधबाधेच्या संशयाने शुक्रवारी  गोवंडीच्या महापालिका उर्दू शाळेत एकच खळबळ उडाली. गुरुवारी या शाळेतील एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा मृत्यू ‘सरकारी’ औषधानेच झाल्याची चर्चा सुरू झाल्याने पालकांमध्ये घबराट पसरली. मग शेकडो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात धाव घेतली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र हा ‘औषधबाधे’चा प्रकार ठाम शब्दांत फेटाळून लावला आहे. दरम्यान, त्या मृत विद्यार्थिनीच्या शवविच्छेदन अहवालानंतरच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार असून राजावाडी व शताब्दीत तपासणीसाठी आलेले सर्व ४५४ विद्यार्थी ठणठणीत असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

संजयनगर पालिका शाळा क्र. २ मध्ये सोमवार, ६ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या एका राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लोक आणि फॉलिक ऑसिडयुक्त गोळय़ा देण्यात आल्या होत्या. सर्व विद्यार्थ्यांबरोबरच चांदणी शेख या विद्यार्थिनीलाही या गोळय़ा दिल्या होत्या. त्यानंतर ती घरी गेली. दुसऱया दिवशी ती शाळेत आली नाही. त्यानंतर बुधवार आणि गुरुवारी ती शाळेत उपस्थित होती, मात्र गुरुवारी रात्री अचानक उलट्या होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळेत दिलेल्या गोळ्यांमुळेच तिचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली आणि पालकांच्या पोटात भीतीचा गोळा आला. या भीतीपोटीच त्यांनी सकाळपासूनच आपल्या मुलांना उपचारासाठी दाखल करण्याचा सपाटा लावला होता.

दरम्यान, विद्यार्थ्यांना मोठय़ा संख्येने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र राऊत, विभाग संघटक डॉ. भारती बावधाने, आरोग्य समिती अध्यक्ष डॉ. अर्चना भालेराव, रत्नागिरी संपर्कप्रमुख सुधीर मोरे, उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, संजय दरेकर, महादेव आंबेकर, तात्या सारंग, हेमंत साळवी, माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, चंदूभाऊ चव्हाण, शाखाप्रमुख अजित गुजर, जीतेंद्र परब, गजानन परब, शरद कोथेरे, नाना ताटेले, सुरेश करकेरा, ज्ञानेश नेरूळकर यांनी रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

दरम्यान, गोवंडी घटनेतील औषधे पुढील आदेशापर्यंत वापरू नयेत असे आदेश वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यावरच कळू शकेल. राजावाडी रुग्णालयात ४१८ तर शताब्दी रुग्णालयात ३६ विद्यार्थ्यांना दाखल केले होते. त्यापैकी सायंकाळी राजवाडीतील ४०१ तर शताब्दीतील २२ विद्यार्थ्यांना घरी सोडले आहे.

रुग्णालयात दाखल केलेले सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्या जिवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. दगावलेल्या विद्यार्थिनीचा शवविच्छेदन अहवाल उद्या आल्यावरच तिच्या मृत्यूचे खरे कारण समजू शकेल. फॉलिक ऑसिडच्या गोळय़ा गेल्या चार वर्षांपासून सर्व शाळांमध्ये दिल्या जातात. मुलांना शाळेत दिलेली खिचडी आणि गोळय़ांचे सॅम्पलही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ही सगळी मुले संजयनगर येथीलच राहणारी असून एकाच शाळेतील आहेत. त्यामुळे त्या दृष्टीनेही तपास केला जाईल.
-मंगेश सातमकर, शिक्षण समिती अध्यक्ष

त्या विद्यार्थिनीचा मृत्यू कशामुळे?
सोमवारी संजयनगर पालिका शाळेतील इतर विद्यार्थ्यांबरोबरच चांदणी शेख या विद्यार्थिनीलाही गोळय़ा दिल्या होत्या. त्यानंतर एक दिवस सुट्टी घेऊन ती पुढील दोन दिवस शाळेला आली होती. त्यामुळे तिचा मृत्यू कशामुळे झाला हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अन्य विद्यार्थ्यांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत
रुग्णालयात ऍडमिट असलेल्या विद्यार्थ्यांनी मळमळ, अस्वस्थता आणि चक्कर येत असल्याची तक्रार केली आहे. मात्र बालरोगतज्ञांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्यात कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना लोह व फॉलिक ऑसिडच्या गोळय़ा व जंतनाशक गोळय़ा राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत दिल्या जातात. मात्र कुठेही अनुचित घडना घडल्याचा अहवाल नाही.
-डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी