पैठणच्या नाथसागर जलाशयात सकाळपासून तब्बल 93 हजार 338 क्युसेक्स याप्रमाणे नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात आता वापरायोग्य 47 टक्के एवढा झाला आहे.
याबाबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी माहिती दिली. त्यानूसार आज सकाळी 6 वाजल्यापासून धरणात पाण्याची आवक विक्रमी गतीने वाढू लागली. सकाळी 8 वाजता 93 हजार 338 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू झाली असून वरच्या भागातील धरणातून जलविसर्ग होत असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रकल्पात सध्या 1746.184 दशलक्ष घनमिटर एवढा जलसाठा उपलब्ध आहे. यापैकी 1008.978 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा वापरायोग्य (जिवंत पाणीसाठा) शिल्लक आहे. धरणातील पाण्याची टक्केवारी आता 47 वर पोहोचली आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण विभागाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली असून वर्षभर मराठवाड्याची तहान भागणार आहे. छत्रपती संभाजीनगर, नगर, जालना व बीड जिल्ह्यातील कृषीसिंचन व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. तसेच चिकलठाणा, वाळुज, चितेगाव, पैठण एमआयडीसी व बिडकीन शेंद्रा डीएमआयसी येथील हजारो कंपन्यांना औद्योगिक पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.