
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
आयटक सलंग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनमिळणेकामी व प्रलंबित मागण्यासाठी काल बुधवारी पंचायत समिती,कोपरगाव येथे काम बंद धरणे आंदोलन केले.
एप्रिल २०१८ पासून ते जानेवारी २०१९ अखेर तालुक्यातील कर्मचाऱ्याचे वेतन झालेले नसल्याने कर्मचाऱ्यावर उपास मारीची वेळ आलेली आहे. दरमहा किमान १० तारखेपर्यंत कर्मचारी वेतन होणे अपेक्षित असतांना केवळ ऑनलाइन लॉग इन न केल्यामुळे कर्मचारी वेतन महिनोमहिने थकीत राहत आहे आणि या सर्व बाबीस केवळ शासन यंत्रणा जबाबदार असल्याने या यंत्रणेस जबाबदार धरत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यांनी शासकीय कामवर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त करत आपल्या मागण्याचे निवेदन सभापती अनुसयाताई होन व गटविकास अधिकारी कपील कलोडे यांना दिले.
यावेळी सहा. गटविकास अधिकारी वळवी,संग्रामकक्षाचे तालुका समन्वयक मोरे,शिवसेना नेते चांदगुडे,कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत वाघ,तालुकाध्यक्ष सतिश ब्राम्हणे,तालुका उपाध्यक्ष भरत साबळे आदींसह तालुक्यातील कर्मचारी मोठे संख्येने उपस्थित होते.
एप्रिल २०१८ पासून ते जानेवारी २०१९ अखेर तालुक्यातील कर्मचाऱ्याचे वेतन तात्काळ जमा करावे, जानेवारी २०१९ पासून शासनाने सुधारित केलेले दराप्रमाणे दरमहा रुपये ३३२५ रुपये राहणीमान भत्ता किमान वेतनासह मिळावा, ज्या ग्रामपंचायती शासन निर्णायाप्रमाणे अमलबजावणी करत नाही अशा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तके ऑनलाईन करण्यात यावे, जलसुरक्षकांचे व रोजगार सेवकांचे मानधन लवकरात लवकर जमा करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात त्यांनी मांडलेल्या आहेत.
यावेळी गटविकास अधिकारी कलोडे यांनी कर्मचारी वेतन अदा होणेबाबत पंचायत समिती स्तरावर योग्य ती कार्यवाही केली असून लवकरच वेतन जमा होतील, असे सांगितले तसेच सुधारीत राहणीमान भत्ता अदा करणेबाबत, कर्मचारी अपघात विमा ग्रामपंचायत मार्फत काढण्याबाबत तसेच कर्मचारी रजेबाबत सर्व ग्रामपंचायतीना लेखी पत्रक देण्याचे आश्वासन दिल्याने सदरचे काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दिला.



























































