‘मार्मिक’च्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा; सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडतेय! उद्धव ठाकरे यांचे सरन्यायाधीश गवई यांना आवाहन

‘सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठय़ावर देशाची लोकशाही तडफडतेय. या लोकशाहीला वेळेत न्यायाचे पाणी पाजले नाही तर लोकशाही मरेल,’ अशी भीती व्यक्त करत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या खटल्यात तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना केले.

‘मार्मिक’च्या 65 व्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा आज रवींद्र नाटय़ मंदिरात झाला. महाराष्ट्रातील लोककला आणि मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे ‘फोक आख्यान’ या सोहळ्यात तुफान गाजले. लोककला, लोकसंगीत अनोख्या पद्धतीने आणि प्रभावीपणे सादर करणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांमध्ये बसून आस्वाद घेतला. ‘फोक आख्याना’ने सर्वांना भारावून टाकले. त्या भारलेल्या वातावरणात उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले.

देशातील सद्यस्थितीवर उद्धव ठाकरे यांनी नेमके बोट ठेवले. देशातले वातावरण पाहता नेमकं बघायचं कुठे? शेतकरी आत्महत्या होताहेत. आणखी अनेक गोष्टी घडताहेत, पण आमचं लक्ष भरकटवून कुठे नेलं जातंय तर कबुतरांकडे… दुसरं कुठे तर कुत्र्यांकडे. आजच मी वाचलं… सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत की, दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना पकडा. मग या निर्णयावरती देशभरातून तीव्र नाराजी व्यक्त झाली. त्याची सरन्यायाधीश गवई साहेबांनी दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबद्दल निर्णय दिलेला असला तरी मी स्वतः त्यात लक्ष घालेन, असे ते म्हणाले. याला म्हणतात कर्तव्यदक्ष सरन्यायाधीश, असे कौतुक करत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या रखडलेल्या खटल्याकडे सरन्यायाधीशांचे लक्ष वेधले.

‘आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठय़ावरती देशातली लोकशाही तडफडते आहे. तीन वर्षे झाली, चार वर्षे झाली, कधी प्राण सोडेल सांगता येत नाही. एक सरन्यायाधीश झाले, दोन झाले, तीन झाले आणि आता आपण चौथे बसलेले आहात. त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचे पाणी नाही दिलंत तर देशातली लोकशाही मरेल. म्हणूनच खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यातदेखील लक्ष घाला, ही मी हात जोडून विनंती करतो,’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी साप्ताहिक ‘मार्मिक’च्या वाटचालीची प्रशंसा केली. 65 वर्षांपूर्वी एका व्यंगचित्रकाराने ‘मार्मिक’ नावाची ठिणगी टाकली आणि त्यातून शिवसेना नावाचा वणवा पेटला. त्यात महाराष्ट्रद्वेष्टे आणि मराठीद्वेष्टे जळून खाक झालेच, पण त्याच शिवसेनेने पुढे जाऊन मुंबई आणि महाराष्ट्रातील हिंदूनाही वाचवले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी ‘मार्मिक’च्या आठवणीही जागवल्या. व्यंगचित्र म्हणजे केवळ ओरबाडायचे नाही. तर मिश्कीलपणे मार्मिकपणे समाजातील विकृती व अनिष्ट प्रथा-परंपरांवर बोट ठेवायचे. हेच काम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्राच्या माध्यमातून केले.

मराठी माणसाने मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिल्यानंतरही मुंबईमध्येच मराठी माणूस उपरा झाला होता. त्याला न्याय मिळवून देण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला. तशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण केली जातेय. अजूनही मुंबईचा लचका, महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का? याचा प्रयत्न मधेमधे चोची मारून केला जातोय. हिंदी सक्तीच्या निमित्ताने किंवा मुंबईचे महत्त्व मारण्याचा निमित्ताने ते सुरू आहेत. ते थांबत नाहीत किंवा ते प्रयत्न करणाऱयांना संपवत नाही तोपर्यंत ‘मार्मिक’ आणि शिवसेनेचं काम थांबणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या सोहळ्याचे प्रास्ताविक केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सुरुवातीची पाच दशके मार्मिकचे संपादक होते. आणीबाणीच्या काळात मार्मिकच्या छपाईवरही बंदी आली होती. त्या काळात महाराष्ट्रातील मराठी जनता मार्मिकच्या पाठीशी अभेद्य पहाडासारखी उभी राहिली होती, असे देसाई म्हणाले.

मनेका गांधी म्हणाल्या की, जर का असे भटके कुत्रे पकडले तर दिल्लीमध्ये झाडावरती माकडं आहेत ती खाली येतील. अहो ती माकडं खाली आलीच आहेत. ऑलरेडी संसदेत पोहोचली आहेत. हे मी उपहासाने बोलत नाही तर तसा व्हिडीओ गेल्या वर्षी जयराम रमेश यांनी ट्विट केलेला आहे. खुर्चीवरती माकडं बसलीत! आता याच्या पलीकडे मी काय सांगू.

सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांचे या सोहळ्याला विशेष सहकार्य लाभले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रबोधन प्रकाशनच्या वतीने गौतम ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दांगट न्यूज पेपर एजन्सीच्या वतीने चारुदत्त दांगट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे यावेळी स्वागत केले.