नातवंडांना पोहायला शिकवताना पाण्यात बुडून आजोबांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

नातवंडांना पोहायला शिकवताना आजोबांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कागल तालुक्यातील करंजिवणे पाझर तलावात घडली आहे. कीर्तनकार तुकाराम दशरथ शेटके (वय 65, रा. करंजिवणे) असे मृत आजोबांचे नाव आहे.

शेटके हे गावाजवळच्या लघुपाटबंधारे पाझर तलावात दुपारी दोनच्या सुमारास आपल्या दोन नातवंडांना पोहायला शिकविण्यासाठी घेऊन गेले होते. नातवंडांना पोहण्यासाठी पाठीवर बांधलेला कॅन सुटल्याने तो आणण्यासाठी ते खोल पाण्यात गेले होते. तेथे त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले.

आजोबा परत न आल्याने नातवंडे गोंधळून गेली. त्यांनी शेजारील शेतात काम करणाऱया सदाशिव शेटके यांना आरडाओरड करून बोलावून घेतले. तेही वयस्कर असल्याने त्यांनी लगेच गावात कळवले. अमोल शेटके, विशाल माळवेकर, संग्राम चौगले व महेश सारंग यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत शोधमोहीम राबविली. मात्र, अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.

शनिवारी सकाळी साडेसात वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू केली. अवघ्या अर्ध्या तासात शेटके यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मुरगूड पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.