शिक्षणाच्या हक्कासाठी ‘एक टिचकी’ उपक्रम, आरटीई प्रवेश प्रक्रियेत गोरगरीब मुलांवर मोठा अन्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
RTE

नवीन शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेशप्रक्रियेत गोरगरीब कुटुंबातील मुलांवर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्याच्या हेतूने कुणबी समाजोन्नती संघाशी संलग्न कुणबी युवा मुंबई (शिक्षण विभाग) आणि कुणबी महिला मंडळाने ‘एक टिचकी-आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी!’ असा उपक्रम हाती घेतला आहे. एक किमी मर्यादा तत्काळ रद्द करून 3 किमीची मर्यादा पूर्ववत करण्याची मागणी मंडळातर्फे करण्यात आली आहे.

आरटीई प्रवेशप्रक्रिया 2026-27मधील अंतराची मर्यादा कमी करण्यावर कुणबी युवा मुंबई (शिक्षण विभाग) आणि कुणबी महिला मंडळाने तीव्र आक्षेप घेतला आहे. आरटीई अंतर्गत पूर्वीची तीन किलोमीटरची मर्यादा कमी करून ती एक किमी करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो वंचित मुलांचे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे स्वप्न धोक्यात आले आहे, याकडे ‘एक टिचकी’ उपक्रमाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले जात आहे. नवीन एक किमी मर्यादा तत्काळ रद्द करून पूर्वीची 3 किमीची मर्यादा पूर्ववत करावी, आरटीई प्रवेश अर्ज संपादित करण्यासाठी पालकांना पुन्हा संधी व पुरेसा वेळ देण्यात यावा, या प्रमुख मागण्या उपक्रमाद्वारे केल्या जात आहेत. उपक्रमा अंतर्गत ‘आक्रोश ईमेल’ एका टिचकीत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे उपक्रम राबवणाऱया मंडळाच्या पदाधिकाऱयांनी सांगितले. शिक्षणाच्या हक्कामध्ये तडजोड नाही, असा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पोहोचवला जात आहे.