संपत्तीच्या वादातून लग्नाच्या वरातीत राडा, पुतण्याने नवरदेवासह वरपित्याला भोसकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपत्तीच्या वादातून पुतण्याने नवरदेवासह आणि वरपित्याला चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना वर्ध्यातील बरबडी परिसरातून उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे नवरदेवची घोड्यावर बसून वाजतगाजत वरात निघाल्यानंतर हा राडा झाला. पुतण्याने केलेल्या हल्ल्यात नवरदेव रितेश भलमे व वरपिता प्रभाकर भलमे या दोघांचाही मृत्यू झाला आहे. माथेफिरू पुतण्या हा अल्पवयीन असून वर्धा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

चुलत भाऊ रितेश भलमे याचे लग्न असल्याने सर्व कुटुंब एकत्रित आले होते. मात्र मनात राग धरून बसलेल्या पुतण्याने केलेल्या प्लॅननुसार लग्नाच्या वरातीत सहभाग घेतला. वरात सेवाग्राम मार्गावरील हनुमान मंदिराजवळ पोहचताच त्याने संधी साधली आणि काकासह चुलत भावाला चाकूने भोसकले. या हल्ल्यात बाप-लेक दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.