जाब विचारल्याच्या रागातून दोघांवर कोयत्याने वार; चौघांना अटक

मुलाला दुचाकीचा कट मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्ती आणि त्याच्या शेजाऱ्यावर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने हल्ला करून कोयत्याने वार केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शिवणेतील राहूलनगरमध्ये घडली. अविनाश गुप्ता ( वय 20), सागर वारकरी (वय 21) , आकाश सिब्बन गौड (वय 19) , सागर राजेंद्र गौड (वय 19, रा. शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रवीण कापसे (वय 42, रा. ग्रीन सिटी, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण यांचा मुलगा साहिलला त्यांच्यासमोर राहणाऱ्या मुलाने दुचाकीचा कट मारला होता. त्यामुळे प्रवीण त्याला जाब विचारण्यासाठी गेले होते. त्याचा राग आल्यामुळे सागर आणि आकाशने साथीदारांना बोलावून प्रवीण यांना मारहाण करून कोयत्याने वार केला. त्याशिवाय आरोपींनी शेजारी राहणारे विजय कदम यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्यांनाही जखमी केले. आरोपींनी प्रवीण यांच्या मामाचा मुलगा अविनाश आणि एका महिलेला मारहाण करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. आर. डेरे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या