लग्नपत्रिका पेरा आणि झाडे उगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । इगतपुरी

पावसाळय़ाच्या उंबरठय़ावर होत असलेल्या मुलीच्या विवाहाचे औचित्य साधून नाशिकच्या अधीक्षक अभियंत्याने लग्नाची पत्रिका पेरून झाड उगवण्याची अनोखी संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. लग्नपत्रिकेचा कागद ५ तास पाण्यात भिजवून जमिनीत त्याचे रोपण केल्यास उपयुक्त रोपाची निर्मिती होईल. हाताने बनवलेल्या कागदाचे कव्हर फुलांपासून तयार करण्यात आले आहे.५ हजारांपेक्षा जास्त लग्नपत्रिका छापण्यात आल्या असून या इको फ्रेंडली पत्रिका जिल्हाभर कौतुकाचा विषय ठरला आहे. यानिमित्ताने पर्यावरण जनजागृतीचा संदेश समाजात जाऊन नैसर्गिक विविधता निर्माण होणार असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

नाशिक येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधीक्षक अभियंता दिलीपराव देशमुख यांची मुलगी स्वरांजली हिचा विवाह चि. राम देशमुख यांच्यासोबत २० जूनला होत आहे. विवाहाच्या निमित्ताने विविध कचरा निर्मिती होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळवण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत ठरतात. यामुळे शुभ विवाह सोहळय़ाच्या निमित्ताने निसर्गाला धक्का बसतो. यावर परिणामकारक उपाय शोधून नैसर्गिक मार्गाने विवाहाला अनेकानेक आशीर्वाद मिळावेत या उद्देशाने दिलीपराव देशमुख यांनी मुलीच्या विवाहासाठी इको फ्रेंडली लग्नपत्रिका बनवण्याचे ठरवले.चवळी आणि झेंडूच्या बियाण्यांपासून या पत्रिका बनवण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता सुभाष वराडे, कांतीलाल उबाळे यांच्या मदतीने या पत्रिकेतील नैसर्गिक संकल्पना साकार झाली. लग्नपत्रिकेच्या निमित्ताने पावसाळय़ाच्या काळात ५ हजारांपेक्षा जास्त झाडांची निर्मिती होणार आहे. या पत्रिकेचा कागद ५ ते ६ तास पाण्यात भिजवल्यानंतर माती, हवा, पाणी, आणि सूर्यप्रकाशात रोपण केल्यास रोप निर्मितीचा आनंद घेता येणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी अनोख्या मार्गाने जनजागृती करणाऱया लग्नपत्रिकेचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

बदलत्या काळात चंगळवादी विवाह सोहळे निसर्गाला घातकी ठरत आहेत. सुसंस्कारात वाढवलेल्या लेकीचे लग्न निसर्गाच्या भरभरून दिलेल्या दानाने व्हावे या उद्देशाने इको फ्रेंडली लग्नपत्रिका तयार केली.
-दिलीपराव देशमुख, अधीक्षक अभियंता