नक्षलवादाला समर्थन करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही! – एकनाथ शिंदे

1241
eknath-shinde

राज्याचे नगर विकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री रूपात पहिल्यांदा गडचिरोलीत आपली उपस्थिती दर्शवली. पोलीस मुख्यालय मैदानावर हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. हेलिपॅडवर जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदे यांनी गडचिरोली पोलिस मुख्यालयात पोहोचत मुख्यालयातील शहीद जवानांच्या स्मृति कक्षाला भेट दिली. यानंतर त्यांनी परिषद कक्षात आत्मसमर्पित नक्षल कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. सरत्या वर्षात गडचिरोलीत 34 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून नक्षलवाद संपवण्यासाठी राज्यसरकार उद्योग वाढीवर भर देणार असून शिक्षणाची दारे खुली करून युवकांना मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे शिंदे म्हणाले. या जिल्ह्यातील सिंचन वाढ व उद्योग वाढ हे आपले लक्ष्य असून जिल्ह्यातील औषधी वनस्पतींच्या उत्पादनावर आपण विशेष भर देणार असल्याचे शिंदे म्हणाले. पीक पद्धतीत बदल- रोजगार निर्मिती करून जिल्ह्याला अग्रेसर करण्याचा आपला मानस असल्याचे शिंदे म्हणाले. नक्षलवाद काबूत आणण्यासाठी आपण विकासाचा धडाका लावणार असल्याचे शिंदे म्हणाले.

गडचिरोलीत बदली झाल्यानंतर कामासाठी रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले आहेत. या जिल्ह्यात क्षमता आहे ती जोपासून आपण पुढे जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. नक्षलवादाला समर्थन करणाऱ्यांची सरकार गय करणार नसल्याचेही शिंदे यांनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या