
कोरोना संसर्गामुळे दोन वर्षांपासून देव आणि भाविकांची ताटातूट झाली होती. मात्र, सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असून, राज्य शासनाकडून गुढीपाडव्यापासून सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवाचे दर्शन घेऊन मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविकांनी देवालयांमध्ये मोठी गर्दी केली होती.
दोन वर्षांपासून साध्या पद्धतीने साजरा होणारा गुढीपाडवा उत्सव ठिकठिकाणी दणक्यात साजरा करण्यात आला. पंढरपुरात आजपासून श्री विठ्ठल-रखुमाईच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात करण्यात आली असून, मंदिरात आज दोन टन फुले आणि 1100 किलो फळांची आरास करण्यात आली होती. करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आंब्यांच्या वनराईत विहार करतानाची पूजा बांधण्यात आली होती. तर, श्री जोतिबागडावर चैत्री यात्रेची लगबग सुरू झाली आहे. गुढीपाडव्यानिमित्ताने शिर्डीत आज श्री साईबाबांची रथयात्रा काढण्यात आली, तर शनैश्वरांना गंगास्नान घालण्यात आले.
साईमंदिरावर ‘श्रद्धा आणि सबुरी’ची गुढी
साईमंदिरावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. मागील दोन वर्षे गुढीपाडवा साध्या पद्धतीने व भक्तांविना साजरा झाला होता. यावेळी मात्र गुढीपाडवा मोठय़ा उत्साहात साजरा झाला. साईमंदिरावर उभारली जाणारी गुढी ‘श्रद्धा आणि सबुरी’चे प्रतीक मानली जाते. मराठी नववर्षाच्या निमित्ताने अनेक भाविक साईदरबारी हजेरी लावतात.
साईबाबांच्या मूर्तीला साखरेच्या गाठींचे हार अर्पण करण्यात आले होते. श्री साईबाबा समाधिमंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली. यावेळी गुढीची विधिवत पूजा करताना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती प्राप्तीकर विभागाचे सहआयुक्त संजय धिवरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अनुराधा आदिक, अविनाश दंडवते, सचिन गुजर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, मंदिर विभागप्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, साईबाबा संस्थानच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त सायंकाळी पाच वाजता श्री साईबाबांच्या रथाची शिर्डी गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे, विश्वस्त ऍड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, महेंद्र शेळके, अण्णासाहेब परदेशी उपस्थित होते.
श्री विठ्ठल मंदिरात 2 टन फुले, 1 टन फळांची आरास
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा नूतन वर्षारंभानिमित्त मंदिर समितीच्या वतीने झेंडू, शेवंती, ऑर्केड, गुलाब अशा तब्बल दोन हजार किलो फुलांचा आणि अननस, डाळिंब, कलिंगड, सफरचंद, संत्री अशा सुमारे 1100 किलो फळांची सजावट करण्यात आली. चिखली (टाळगाव) येथील श्री विठ्ठलभक्त नाना बबन मोरे आणि नवनाथ नामदेव मोरे यांनी सजावटीसाठी फुले उपलब्ध करून दिली आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील कर्मचारी आणि ‘श्री साई डेकोरेटर्स’ (शिंदे ब्रदर्स) यांनी ही फुलांची सजावट केली आहे.
पदस्पर्श दर्शनाने भाविक भारावले
कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे बंद असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. आज दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मंदिरात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तर, पदस्पर्श दर्शन मिळाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱया भाविकांना मात्र मास्कची सक्ती करण्यात आली आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी पुष्पवृष्टी करीत भाविकांचे स्वागत केले.
शेकडो कावड यात्रींनी शनैश्वरांना घातले गंगास्नान
नववर्ष गुढीपाडवा उत्सव शनिशिंगणापुरात मोठय़ा दिमाखात साजरा करण्यात आला. सकाळी 11 वाजता प्रवरासंगम येथून शेकडो कावड यात्री भाविकांनी आणलेल्या पवित्र जलाने शनैश्वरांना गंगास्नान घालण्यात आले. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीने सर्व उत्सव, धार्मिक कार्यक्रम पूर्ण बंद होते. आता यातून सुटका मिळाल्याने यंदाचा गुढीपाडवा उत्सव मोठय़ा दणक्यात साजरा करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली. दरम्यान, गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाकाळात शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योगधंदे बंद पडले. बेरोजगारी वाढली. सामान्य माणूस पाच वर्षे मागे गेला. मंदिरे बंद झाली. त्यामुळे आता पुन्हा कोरोनाचे विघ्न येऊ नये, सर्वत्र सुख-समाधान नांदो, अशी प्रार्थना शनिदेवांकडे केल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.
श्री अंबाबाईची वनराईत विहार करतानाची पूजा
गुढीपाडव्यानिमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीची आंब्यांच्या वनराईत विहार करतानाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. तर, वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची परंपरेनुसार बांधण्यात येणारी राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. दरम्यान, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱयांपैकी निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिंमतबहाद्दूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी सवाद्य मिरवणुकीने सकाळी डोंगरावर दाखल झाली. 12 एप्रिल रोजी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर चैत्री यात्रेसाठी भाविक येण्यास प्रारंभ होणार असून, आता जत्रेची लगबग सुरू झाली आहे.


























































