Gudipadwa festival – नवसंवत्सर आले… सुख, शांती, समाधान घेऊन आले… अशी करा नववर्षाची सुरुवात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश जोशी

गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्ष सुरू होते. यंदा 19 मार्च रोजी नववर्ष सुरू होत आहे. नववर्षाच्या सुरुवातीला संवत्सरफल वाचण्याची किंवा ते श्रवण करण्याची प्राचीन पंरपरा आहे. त्यामुळे पुर्वीच्या काळी कोणतीही अद्ययावत तंत्रज्ञान नसल्याने ज्योतिषाच्या अभायासाने, पीकपाणी, शेतीपीके, पावसाची शक्यता याची भाकिते वर्तवण्यात येत असत. त्यामुळे ही परंपरा सुरू झाली, असे मानण्यात येते. त्याचप्रमाणे नवसंवत्सर म्हणजे नेमके काय, याची माहिती घेऊ या.

यंदा कलियुग शक (युगाब्ध) 5128 असून महावीर संवत 2552-53, विक्रम संवत 2082-83, शालिवाहन शक 1948, शिवशक 352-53 आहे. म्हणजे पाश्चात्य दिनदर्शिकेप्रमाणे इसवीसन 2026-27 आहे. ही या संवत्सराची प्राथमिक ओळख आहे. यंदा विक्रम संवत 2082-83 असून पराभव नावाचे संवत्सर आहे. अनेक पंचागांमध्ये संवत्सर फल दिलेले असते. गुढीपाडव्याच्या दिवशी याचे वाचन करण्यात येते.

पंचागामध्ये दिलेली नवसंवत्सराची माहिती

।। श्री गणेशाय नमः ।। श्रीसरस्वत्यैनमः ।। अथ संवत्सरफलम् ।। स जयति सिंधुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् । वासरमणिरिव तमसां राशीन् नाशयति विघ्नानाम् ।।१।। ।। नत्वा गणपतिं खेटान् ब्रह्मविष्णुशिवात्मकान् । संवत्सरफलं वक्ष्ये सर्व कामार्थसिद्धये ।। २ ।।

प्रारंभी श्रीगजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्या प्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्या प्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुरवदन देव उत्कर्ष पावत आहे. अशाप्रकारे गणेशाचे स्मरण करत नववर्षफल सांगण्यात येते. त्यानंतर सर्व कार्याची सिद्धि होण्याकरिता श्रीगणपति, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सरफल सांगतात.

असे साजरे करा नववर्ष

नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगलस्नान (अभ्यंग) करून ब्राह्मणासह देवांची व गुरूची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिष्याचा सत्कार करून त्यांजकडून वर्षफल श्रवण करावे. म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून भक्षण करावे. म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी (संपत्ति) ही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून, रोगशांति होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे, ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ति दानादिकांनी संतोषवून मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा. म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धि स्थिर होते. पश्चाद्धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते.

।। चैत्रे पुण्यमये वसंतसमये नव्यं फलं वार्षिकं नित्यं यः शृणुयादघौघदलनं चायुर्यशः श्रीकरम् ।। वेधा विष्णुहरौ रवींदुमहिजाः सौम्योगुरुर्भार्गवो मंदोऽगुः सशिखश्च शतदलनं कुर्वन्तु सर्वे ग्रहाः ।।३।।

प्रतिवर्षी वसंतऋतूंत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यांत नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धि होते. ब्रह्मा, विष्णु, महेश, रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु व केतु हे सर्व शतूंचा नाश करोत. वर्षप्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सरफल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्यरहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनि आनंद व राहु बाहुबल देवो आणि केतु तुमच्या कुलाची उन्नति करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्रश्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोगनाश होतो. करणाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य
पंचांग श्रवण केले असता सिद्धि प्राप्त होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे दरवर्षी नववर्षात हे फल श्रवण करण्याची प्रथा आहे.