आनंदाचा शिधा गुढीपाडव्याला मिळण्याच्या शक्यता धूसर, नगरमध्ये अद्यापि साहित्य पोहोचलेले नाही

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिह्यातील सामान्य, गोरगरिबांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. शासकीय कर्मचाऱयांनी संप मागे घेतला असला, तरी अद्यापि जिह्यापर्यंत मालच पोहोचलेला नाही. गुढीपाडव्याला दोनच दिवस राहिल्याने हा शिधा सर्वसामान्यांना मिळण्याच्या शक्यता आता धूसर झाल्या आहेत. दरम्यान, यंदा गुढीपाडव्याला नव्हे, तर पुढील महिन्यात असणाऱया भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवेळी पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने सरकारने ‘आनंदाचा शिधा’ हा प्रत्येकाला दिला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, आजही अनेक ठिकाणी माल पोहोचला नाही किंवा जिल्हापातळीवर काही ठिकाणी त्याचे वितरणसुद्धा झालेले नाही. बुधवारी गुढीपाडवा आहे. अवघा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे हा शिधा गरिबांपर्यंत कसा पोहोचणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

राज्यातील सर्वसामान्य, गोरगरिबांना 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून सरकारी कर्मचाऱयांच्या संपामुळे या शिधावाटपाला उशीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना हा शिधा देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक कोटी 63 लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. दारिद्रय़रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार आहे. ‘आनंदाचा शिधा’ गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पासद्वारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल.

‘ई-पॉस’ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. हा ‘आनंदाचा शिधा’ देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता ‘महाटेंडर्स’ या ऑनलाइन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधा जिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रतिसंच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर आनुषंगिक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चासदेखील मान्यता देण्यात आलेली आहे.

राज्यस्तरावरून ‘आनंदचा शिधा’ हा गुढीपाडव्याला नव्हे, तर पुढील महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदरम्यान देण्यात येणार आहे. नगर जिह्यात ‘आनंदचा शिधा’ योजनेसाठी सहा लाख 94 हजार 700 शिधापत्रिकाधारक पात्र असून, सोमवारी (20 रोजी) राज्य सरकारच्या पुरवठा विभागाकडे ‘आनंदाचा शिधा’ किटची मागणी नोंदविण्यात आली आहे. – जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी, नगर.