महापालिका निवडणूक गुजरातेत भाजपच!

गुजरातमधील 6 महानगरपालिका निवडणुकांत राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व राखत सर्व 6 पालिकांवर सत्ता मिळवली आहे. अहमदाबाद, सुरत, राजकोट, वडोदरा, जामनगर आणि भावनगर महानगरपालिकेत पुन्हा भाजपलाच बहुमताने सत्ता मिळाली आहे. 21 फेब्रुवारीला झालेल्या महापालिकेच्या 576 जागांवरील मतदानाची मतमोजणी आज झाली. त्यात 401 जागांवर विजय मिळवत भाजपने गुजरातमध्ये सुसाट यश मिळवले आहे. काँग्रेसला या निवडणुकांत केवळ 50 जागा जिंकता आल्या आहेत.

यंदाच्या निवडणुकीत प्रथमच खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने अहमदाबादेत 6 वॉर्डांत आपले उमेदवार उभे केले होते. ते सुरुवातीला 3 वॉर्डांत आघाडीवर होते, पण नंतर मात्र ते मागे पडले. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता गुजरातेतील महानगरपालिका निवडणुकीत आपली पूर्ण ताकद झोपून दिली होती. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीही निवडणूक प्रचारात हिरिरीने सहभाग घेतला होता.

सुरतमध्ये काँग्रेस तिसऱया स्थानी

सुरतमध्ये 2015 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला समाधानकारक यश मिळले होते. पण यंदाच्या निवडणुकीत पाटीदार समाजाचा पाठिंबा आम आदमी पक्षाला मिळाल्याने काँग्रेसला सुरतमध्ये तिसऱया स्थानावर जावे लागले आहे. भाजपलाही सर्व 120 जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठता आले नाही. आम आदमी पक्षाने सुरतमध्ये पाटीदार समाजाचेच उमेदवार उभे केल्याने ‘आप’ला या निवडणुकीत मोठे यश मिळवता आले आहे. गेल्या सुरत महानगरपालिकेत भाजपला 80 तर काँग्रेसला 36 जागा जिंकता आल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या