
कोरोनाचा भयंकर कहर सुरू असलेल्या गुजरातमध्ये रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येची लपवा-छपवी करणारा महाघोटाळा उघडकीस आला आहे. अवघ्या 71 दिवसांत तब्बल सवालाख मृत्यू दाखले अर्थात डेथ सर्टिफिकेट सरकारने दिले. मात्र यातील केवळ 4218 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद केली आहे. भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपाणी सरकारच्या या भयंकर कारभारामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे.
एका गुजराती दैनिकाने रुपाणी सरकारचा भांडाफोड केला असून, थरकाप उडवणारी आकडेवारी देशासमोर आणली आहे. 33 जिल्हे आणि 8 महापालिका क्षेत्रांमध्ये 71 दिवसांत 1 लाख 23 हजार 871 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री रुपाणींचा भयंकर तर्क
कोरोना मृतांच्या नोंदीच्या लपवाछपीवर मुख्यमंत्री रुपाणी यांनी काही दिवसांपूर्वी भलताच तर्क मांडला होता. जर एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्याला जर मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनीविकार अशा सहव्याधी असतील तर त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला असे म्हणता येणार नाही. मृत्यूचे कारण शोधले जाईल. आयसीएमआरच्या गाईडलाईन्स अशा आहेत, असा दावा रुपाणी यांनी केला.
पाच महापालिकांमधील 71 दिवसांची आकडेवारी
शहर मृत्यू दाखले कोरोनाने मृत्यू
अहमदाबाद 13593 2126
सुरत 8851 1074
राजकोट 10887 288
वडोदरा 7722 189
भावनगर 4158 134
गेल्यावर्षी मार्च 2020 मध्ये 23353, एप्रिलमध्ये 21519 आणि मे महिन्यात 13125 मृत्यूची नोंद गुजरातच्या सरकारने केली होती. यावर्षी मार्च 2021 मध्ये 26026, एप्रिलमध्ये 57796 तर 10 मेपर्यंतच 40051 मृत्यूची नोंद झाली म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट मृत्यू झाले.



























































