पीपीई किटमध्ये सापडला नर्सचा मृतदेह, पतीच निघाला खुनी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील वडोदरा शहरात पीपीई किटमध्ये एका नर्सचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. ही नर्स येथील स्थानिक गोत्री सिव्हिल रुग्णालयात काम करत होती. शिल्पा जयेश पटेल असं या नर्सचं नाव होतं. पोलिसांना रुग्णालयाच्या शेजारीच असलेल्या रस्त्यावर शिल्पाचा मृतदेह सापडला.

शिल्पाच्या पतीनेच तिची हत्या करून मृतदेह रस्त्यावर सोडला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी जयेश पटेल याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश हा पेशाने शिक्षक आहे. शिल्पा आणि जयेश यांच्यात गेल्या एक वर्षांपासून सतत भांडणे होत होती. शुक्रवारी रात्री शिल्पा आपली ड्युटी संपून घरी जात असताना रस्त्यात तिला जयेश भेटला. जयेश कार घेऊन आला होता. शिल्पा कारमध्ये बसल्यानंतर त्यांच्यात भांडण होऊन हाणामारी झाली. यावेळी जयेशने कारमध्येच असलेल्या एका प्लॅस्टिकच्या कठीण वस्तूने शिल्पाच्या डोक्यात वार केला. ज्यात ती गंभीर जखमी झाली आणि जागीच तिचा मुत्यू झाला. जयेशने हा अपघात असल्याचा बनाव रचत तिला रस्त्याच्या कडेला उभ्या एका स्कूटर शेजारी सोडलं.

पोलिसांना शिल्पाचा मृतदेह सापडल्यानंतर ते जयेश याला सूचना देण्यासाठी त्याच्या घरी गेले. यावेळी पोलिसांना जयेशच्या पोटावर आणि हातावर रक्ताचे डाग दिसले. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी जयेशची चौकशी केली. चौकशी दरम्यान आपणच शिल्पाची हत्या केली असल्याचं त्याने मान्य केलं. दरम्यान, पोलिसांनी जयेशला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.