
कोरोना विषाणूमुळे अवघं जग वेठीला धरलं गेलं आहे. देशातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत एका गावात मात्र आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण न सापडल्याची नोंद केली आहे.
शिस्तीचा परिणाम
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या वाधवान तालुक्यात करियानी नावाचं गाव आहे. या गावाने हा विक्रम केला आहे. अवघ्या अकराशे लोकसंख्येच्या या गावात सरपंचांच्या शिस्तीमुळे हे शक्य झालं आहे.
या गावचे सरपंच भोपाभाई मामकिया यांनी स्वखर्चाने 14 जणांचं एक पथक स्थापन केलं आहे. कोरोना काळात जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा मामकियांनी या पथकाला स्वखर्चाने गणवेश, बूट आणि लाठ्या दिल्या. या 14 जणांचं मुख्य काम गावच्या वेशींवर बारीक नजर ठेवून नवख्या माणसाला वेशीवरच थांबवणं हे होतं.
हे 14 जण गावाच्या बाहेरून येणाऱ्या माणसाला तिथेच थांबवून परत पाठवून देत होते. त्यामुळे गावच्या बाहेरून संसर्ग होण्याची शक्यताच नाहीशी झाली. मामकिया यांच्या म्हणण्यानुसार, या दरम्यान गावात बाहेरून भाजीपाला देखील मागवण्यात आला नाही. गावच्या शेतात जी भाजी पिकत होती, त्यावरच ग्रामस्थांनी गुजराण केली. त्यांच्या याच शिस्तीचा परिपाक म्हणून आजतागायत या गावात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही.
ग्रामीण भागाने मारली बाजी
एकिकडे गुजरातच्या शहरी भागात कोरोना रुग्णांची भर पडत असताना ग्रामीण भागात मात्र वेगळं आणि आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. केवळ करियानीच नव्हे तर गुजरातच्या अनेक गावांमध्ये शिस्त आणि सामाजिक अंतराच्या साहाय्याने कोरोनाला रोखण्यात येत आहे.
जामनगर येथील हापा गावात ग्रामस्थांनी स्वखुशीने गावातील होऊ घातलेले विवाह पुढे ढकलले आहेत. गावाबाहेरच्या मंडळींना गावात प्रवेश नसल्याचं पंचायतीने जाहीर केलं आहे. तसंच ग्रामस्थांनी आपल्या शहरी भागातील नातेवाईंकाना कोरोनाची परिस्थिती जाईपर्यंत गावी भेटायला येण्याची मनाई केली आहे. गावकऱ्यांच्या या संयुक्त परिश्रमाचं फलित म्हणून अनेक गावं आज कोरोनाच्या तडाख्यातून वाचली आहेत.






















































