मुख्यमंत्री कार्यालयावर गुजरातचा ‘आयटी वॉच’?

महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवण्यात येत आहेत. दुसरीकडे गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही भागांत सुट्टी दिली जात आहे आणि आता थेट मुख्यमंत्री कार्यालयात गुजरातमधील आयटी तज्ञाची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यामुळे मंत्रालयात सर्वांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयातील बहुतांश अधिकारी मराठी आहेत. पण त्यामध्ये या आनंद माडिया या गुजराती भाषक अधिकाऱयाचा समावेश झाल्यामुळे सर्वांच्या नजरा या नावावर खिळल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त केलेल्या सर्व अधिकाऱयांची नावे व त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या खात्यांची यादी तयार करण्यात आली आहे, पण या यादीमध्ये आनंद माडिया यांचे नाव व त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी याचा कुठेही उल्लेख नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या सर्व महत्त्वाच्या बैठकांमध्ये त्यांचा सहज वावर दिसून येत असल्याचे मंत्रालयातील अधिकारी सांगतात. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालयात पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या वॉररूमच्या महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आलेले राधेश्याम मोपलवार यांच्या दालनाशेजारीच आनंद माडिया यांना केबिन देण्यात आली आहे. त्यावर आनंद माडिया विशेष कार्याधिकारी एवढेच नमूद केले आहे. मात्र फेसबुक-गुगलवर आनंद माडिया यांच्या नावाचा शोध घेतला असता गुजरातमधील आयटी तज्ञ असे दाखवण्यात येत आहे. राज्याचा माहिती-तंत्रज्ञान विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांना या खात्यात मदत करण्यासाठी आनंद माडिया यांची नियुक्ती केल्याचा कयास वर्तवला जात आहे. दुसरीकडे आनंद माडिया यांचा दिल्लीत भाजप वर्तुळात दबदबा आहे. राज्यातील दिल्लीतील कामे मार्गी लावण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असल्याचेही सांगण्यात येते, पण आनंद माडिया यांची नियुक्ती महाराष्ट्रातील नंबर दोन क्रमांकाचे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून झाली आहे का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेवरून झाली आहे, अशी चर्चा आता मंत्रालयात रंगली आहे.

फडणवीस यांचाही वॉच

शिवसेना, मनसे, काँग्रेस असा प्रवास करीत आता भाजपमध्ये दाखल झालेले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय विश्वासातील आशीष कुलकर्णी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयातच विशेष कार्य अधिकारी म्हणून झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील व्यक्ती  आशीष कुलकर्णी यांना उपमुख्यमंत्री कार्यालयात रुजू करून घेण्याऐवजी मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त केल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयावर देवेंद्र फडणवीस यांचा ‘वॉच’आहे का, असा सवाल मंत्रालयात विचारण्यात येत आहे. त्या नंतर आता गुजरातमधील आनंद माडिया यांनाही मुख्यमंत्री कार्यालयातच जबाबदारी दिल्यामुळे संशय बळावला आहे.