जगज्जेत्या गुकेशला रशियाच्या 12 वर्षीय स्लोकिनचा धक्का, एका चुकीने हातातला सामना गेला

जगज्जेता हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टर डी. गुकेशला फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये रशियाच्या 12 वर्षीय सर्गेई स्लोकिन याच्याकडून पराभवाचा धक्का बसला. एका महत्त्वाच्या चुकीचा गुकेशला फटका बसला आणि तरुण फिडे मास्टरविरुद्ध तो उलटफेराचा बळी ठरला.

डी. गुकेशची ब्लिट्झ रेटिंग 2628 असून ती स्लोकिनच्या सुमारे 2400 रेटिंगपेक्षा 228 गुणांनी अधिक आहे. दोन्ही खेळाडूंमधील दर्जातही मोठा फरक आहे. गुकेश हा 2750 पेक्षा जास्त क्लासिकल रेटिंग असलेला सुपर ग्रँडमास्टर आहे, तर स्लोकिनकडे फिडे मास्टरचा किताब आहे, जो ग्रँडमास्टरपेक्षा दोन स्तर खाली मानला जातो. एवढा फरक असूनही स्लोकिनने गुकेशला कडवी झुंज दिली.

कसा गेला हातातला सामना

स्लोकिनविरुद्ध गुकेश चांगल्या स्थितीत होता आणि सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला होता, मात्र  70 व्या चालीनंतर सामन्याचा प्रवाह पूर्णपणे बदलला आणि गुकेशला सावरणे शक्य झाले नाही. काळय़ा मोहऱयांनी खेळताना गुकेशकडे केवळ आठ सेकंद शिल्लक होते, तर स्लोकिनकडे सुमारे 13 सेकंद होते. याचवेळी तरुण खेळाडूने हत्तीची अदलाबदल सुचवली. गुकेश एक प्यादा मागे होता, पण ही अदलाबदल सामना बरोबरीत आणू शकली असती, मात्र जिंकण्याची शक्यता कायम ठेवण्यासाठी गुकेशने ही अदलाबदल नाकारत 70 आरएफ 4 ही चाल खेळली. हा निर्णय त्याला महागात पडला. स्लोकिनने संधीचा अचूक फायदा घेत लवकरच एक बिशप जिंकला. त्यानंतर गुकेशची स्थिती अधिकच खराब झाली. लढण्यासाठी कोणताही प्यादा उरला नसल्याने सुमारे दहा चालींनंतर गुकेशने पराभव स्वीकारला.

एरिगैसीचा विजय; कार्लसनचा संताप!

हिंदुस्थानच्या अर्जुन एरिगैसीविरुद्ध पराभव झाल्यानंतर नॉर्वेचा दिग्गज खेळाडू मॅग्नस कार्लसनच्या मानसिक कमकुवतपणा पुन्हा एकदा उघडा पडला. रॅपिड चॅम्पियनशिपमधील कार्लसनचे विजेतेपद आणि अर्जुन एरिगैसीचे संयमी वर्तन हिंदुस्थानी बुद्धिबळाचा वाढता प्रभाव आणि क्रीडासंस्कृतीही अधोरेखित करते. दोहामध्ये झालेल्या नवव्या फेरीत हिंदुस्थानी ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसीकडून पराभव झाल्यानंतर कार्लसनने रागात टेबलवर हात आपटला. हा क्षण कॅमेऱयात कैद झाला आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. दोनच दिवसांपूर्वी रॅपिड विभागात रशियन ग्रँडमास्टर व्लादिस्लाव आर्टेमिएवकडून पराभव झाल्यानंतर कार्लसनने रागात हस्तांदोलन केले. आपला ब्लेझर उचलला आणि वेगाने तिथून निघून गेला. बाहेर जाताना जवळ आलेल्या एका पॅमेऱयालाही त्याने धक्का मारत अखिलाडूपणाचे दर्शन घडविले होते.