गुकेशच बुद्धिबळाचा नवा विश्वनाथ; 18 व्या वर्षीच फिडेचे जगज्जेतेपद जिंकण्याचा रचला इतिहास

हिंदुस्थानचे बुद्धिबळातील साम्राज्य वाढत असल्याचे 18 वर्षीय ग्रॅण्डमास्टर गुकेश डोम्माराजूने पुन्हा एकदा सिद्ध करत फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेवरही तिरंगा फडकावला. त्याने हिंदुस्थानी बुद्धिबळ जगतासाठी अभिमानाने मान उंचावणारी कामगिरी करताना विश्वनाथन आनंदच्या विक्रमालाही मागे टाकत कॅण्डिडेट अजिंक्यपदापाठोपाठ जागतिक स्पर्धा जिंकत ‘बुद्धिबळाचा किंग’ असल्याचे दाखवून दिले. 13 व्या फेरीअखेर बरोबरीत असलेल्या गुकेश जगज्जेत्या डिंग लिरेनचा पराभव करत 7.5 गुणांसह आपल्या पहिल्या जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली. विश्वनाथन आनंदने 25 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला होता, तर गुकेशने अठराव्या वर्षीच हे अठराव्या फिडेचे जगज्जेतेपद काबीज केले.

गुकेशने आज हिंदुस्थानी बुद्धिबळासाठी अनेक विक्रम रचले. विक्रमादित्य गॅरी कास्पारोव्ह यांनी वयाच्या 22 व्या वर्षी जो पराक्रम केला होता तो गुकेशने वयाच्या अठराव्या वर्षीच साकारत नवा इतिहास रचला. ही स्पर्धा जिंकणारा गुकेश विश्वनाथन आनंदनंतर पहिलाच बुद्धिबळपटू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदने 25 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. 1994-95 साली आनंद या स्पर्धेचा विजेता ठरला होता. त्यानंतर तब्बल 19 वर्षांनंतर 2014 साली आनंद दुसऱयांदा विजेता ठरला. आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या गुकेशला हे यश मिळवता आले आहे. सर्वात तरुण विजेता ठरलेल्या गुकेशने सर्वात तरुण जगज्जेता होण्याचाही विश्वविक्रम केला. चीनच्या डिंग लिरेनने गेल्या वर्षी रशियन इयान नेपोमनियाच्चीला नमवत जगज्जेतेपद मिळवलेले होते, मात्र यावेळी तो आपले जगज्जेतेपद राखू शकला नाही. गेल्या वर्षी टायब्रेकरमध्ये डिंगने बाजी मारली होती. गुकेशला या पराक्रमानंतर 13 लाख डॉलर्सचे इनाम देण्यात आले.

आशियाई क्रीडा स्पर्धेतही जिंकले होते रौप्य

गुकेशने गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. 2015 मध्ये गुकेश आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये 9 वर्षांखालील गटाचे विजेतेपद जिंकून मास्टर बनला. गुकेशने आतापर्यंत 5 सुवर्ण आशियाई युवा स्पर्धा जिंकल्या आहेत. 2019 मध्ये तो हिंदुस्थानचा सर्वात तरुण आणि जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रॅण्डमास्टर बनला होता.

अभिनंदनाचा वर्षाव

गुकेशने जगज्जेतेपद जिंकताच अवघ्या क्रीडा विश्वातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. बुद्धिबळपटूच नव्हे तर क्रिकेटपटू, नेमबाज, ऍथलीट्सने गुकेशच्या पराक्रमाचे कौतुक केले.

हा क्षण बुद्धिबळासाठी अभिमानाचा आहे. हिंदुस्थानसाठी अभिमानाचा आहे. 18 व्या वर्षीच जगज्जेतेपद पटकावणे एक मोठा पराक्रम आहे. या विजयामुळे महत्त्वाकांक्षी खेळाडूंना प्रेरणा मिळेल.विश्वनाथन आनंद, माजी जगज्जेता

गुकेशने आपल्या विजयासह अनंत शक्यतांच्या विश्वाला खुले केले आहे. 18 व्या वर्षी 18 वा जगज्जेता ठरल्याबद्दल अभिनंदन. विश्वनाथनच्या पावलांवर पावले ठेवत आपण हिंदुस्थानी बुद्धिबळातील प्रतिभाशाली खेळाडूंच्या पिढीचे मार्गदर्शन करत आहात.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

गुकेश अभिनंदन. तू आपल्या अद्भुत यशाने नव्या पिढीला मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आहेस. दबावाखाली आपली प्रतिभा, आपला संकल्प आणि आपल्या संस्कारांनी अवघ्या देशाचा गौरव केला आहे. तू केवळ एक किताब जिंकला नाहीस, नव्या पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली आहेस.अभिनव बिंद्रा, ऑलिम्पिक सुवर्ण विजेता

वाह गुकेश. 18 व्या वर्षीच जगज्जेता ठरलास. आमच्यासाठी तू एक आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण दिला आहेस. सर्वांसाठी प्रेरणा बनलास.वीरेंद्र सेहवाग, माजी कसोटीपटू