उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावान मित्र मानले जाणारे गुणरत्न सदावर्ते यांनी पत्नी अॅड. जयश्री पाटील यांना याचिकाकर्त्या बनवून ’महाराष्ट्र बंद’विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. सदावर्ते यांनी यापूर्वीही संवेदनशील प्रकरणांत अशाचप्रकारे ’लुडबुड’ केली होती. त्यात प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा निर्णय, शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन, मनोज जरांगे यांचे आंदोलन आदी संवेदनशील प्रकरणांचा समावेश आहे.
मराठा आरक्षणविरोधात याचिका
n 2017-18 मध्ये मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधत राज्यभरात मोर्चे काढले. त्यादरम्यान मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्या आरक्षणाला विरोध करीत गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी सर्वेच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर न्यायालयाने 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षणाचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला.
n अलीकडेच मिंधे सरकारने 50 टक्क्यांची आरक्षणमर्यादा ओलांडून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. या आरक्षणाविरोधातही सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला विरोध
गेल्या वर्षी मार्च महिन्यात राज्यातील 17 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला होता. इथेही सदावर्ते यांनी संपाविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली होती.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध याचिका
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोटय़ातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आक्रमक आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनावेळीही सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे केले होते नेतृत्व!
’महाराष्ट्र बंद’मुळे जनजीवन विस्कळीत होईल, असा दावा करणाऱ्या सदावर्ते यांनी गेल्या वर्षी ’महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ मानली जाणारी एसटी ठप्प करण्याचा इशारा दिला होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने संपाची हाक दिली होती.