>> गुरुनाथ तेंडुलकर
तुम्हाला ही गोष्ट नक्कीच ठाऊक असेल. एक धोबी आणि त्याचा मुलगा आठवडय़ाच्या बाजारात गाढव खरेदी करायला गेले. येताना सटरफटर बरीच खरेदी झाली. वजन असलेल्या सामानाची थैली मुलाने डोक्यावर घेतली आणि बापाने गाढवाच्या गळ्यातली दोरी धरून चालायला सुरुवात केली. दुपार झाली, अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. दोघेही पार थकले होते. वाटेत एकजण भेटला नि म्हणाला, ‘एवढं गाढव सोबत असूनही तुम्ही पायी चालताय? तुम्हीच खरे गाढव आहात…’
बाप मुलाला म्हणाला, ‘तू सामान घेऊन गाढवावर बस. मी चालतो.’ त्यांना तसं चालताना पाहून आणखी दोनजण म्हणाले. ‘काय दिवस आलेत? तरणाताठा मुलगा गाढवावर बसलाय आणि म्हातारा बाप पायी चालतोय.’ मुलगा उतरला आणि बाप गाढवावर बसला. आता लोक म्हणू लागले. ‘बाप एकटाच आरामात बसलाय. पोरगा बिचारा चालतोय…’ त्यानंतर दोघेही गाढवावर बसले तर लोक म्हणू लागले की ‘काय माज आलाय बाप-लेकाला… त्या मुक्या प्राण्यावर दोघेही बसलेत. बिचाऱया गाढवाचे किती हाल होताहेत…’
अखेरीस लोकांच्या या उलटसुलट बोलण्याला कंटाळून त्या बापलेकांनी गाढवाला आडवा पाडून त्याच्या पायाला लांब बांबू बांधला आणि त्याला उलटा उचलून घेऊन चालायला सुरुवात केली. गाढवाची ही अजब यात्रा पाहून आजूबाजूचे लोक गोळा झाले. शिटय़ा-टाळ्या वाजवू लागले. गाढव बिथरलं. पाय झाडू लागलं. एव्हाना ही पालखी नदीवरच्या पुलावरून चालली होती. गाढवाने पाय झाडून बांधलेल्या दोऱया तोडल्या आणि त्या गडबडीत गाढव नदीत पडून वाहून गेलं. रिकामा पोकळ बांबू घेऊन बापलेक घरी परतले.
माझ्या एका मित्राची विवाहित मुलगी लग्नापूर्वी गाणं शिकली होती. लग्नानंतर मात्र तिचं गाणं बंद पडलं. पण अलिकडेच तिला तिच्या क्लासमधल्या सरांनी बोलावून घेतलं आणि तिच्या आवाजात काही गाणी
रेकॉर्ड केली. त्यानंतर तिची अमेरिकेतल्या एका शोसाठी निवडही झाली. पण तिने ती संधी नाकारली. कारण तिच्या म्हाताऱया सासू-सासऱयांकडे बघायला कोणी नव्हतं. थोरली जाऊबाई नोकरी करणारी होती. धाकटी नणंद कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. अशा अनेक अडचणींचे अडथळे मार्गात उभे राहिले. अशा वेळी नवऱयाने प्रोत्साहन द्यायला हवं होतं. सासू-सासऱयांनी थोडा समजूतदारपणा दाखवायला हवा होता. पण जवळच्या नातेवईकांनी तिचे पायच ओढले. ‘तू काय स्वतला लता मंगेशकर समजतेस की आशा भोसले?’ हिरमुसलेल्या तिने स्वतच्या मनापेक्षा जनांचं ऐकलं.
अशी अनेक उदाहणं आपल्याला आजूबाजूला दिसतात. एवढंच नाही तर आपणही लोकांचा विचार करतो आणि वागतो. आजूबाजूचे लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतचा आतला आवाज दाबून टाकतो.
दहा वर्षांपूर्वी माझ्या एक नातेवाईक बाईंचा नवरा अपघातात अचानक गेला. त्यावेळी त्या बाईंने साठी ओलांडली होती. दोन्ही मुलं परदेशात स्थायिक होती. तिच्याच परिचयातील एका गृहस्थाने सहा महिन्यांनंतर तिला चक्क लग्नासाठी विचारलं. तेही साधारण तिच्याच वयाचे होते. त्यांची पहिली पत्नी दीर्घ आजारानंतर वारली होती. ते मुंबईत एकटेच राहत होते. विवाहित मुलगी बंगलोरला आयटी कंपनीत होती. मुलीचा वडिलांना पाठिंबा होता. त्या बाईंनाही हा प्रस्ताव मनातून पटला होता. उरलेलं आयुष्य एकाकी काढण्यापेक्षा परिचयातलाच माणूस जर सहचरी म्हणून लाभला तर आयुष्याच्या उत्तरायण सुखावह होईल. त्या गृहस्थाच्या मुलीने बाईंना खूप समजावलं. पण… ‘या वयात लग्न…? लोक काय म्हणतील…? ज्या वयात केसांना मेंदी लावायची त्या वयात हाताला मेंदी लावणं शोभेल का?’ असा विचार करून त्या बाईंनी नकार दिला. आता या घटनेला बरीच वर्षं होऊन गेली आहेत. अलिकडे एका समारंभात त्या बाई मला भेटल्या. बोलता बोलता त्यांनी जनाचं ऐकून मनाचं नाकारल्याची कबुली दिली, त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.
तुमच्या पाहण्यात-ऐकण्यातदेखील अशी काही उदाहरणं आढळतील असतीलच. म्हणूनच हिंदीत एक म्हण आहे. ‘सबसे बडा रोग… क्या कहेंगे लोग?’
लोक काय म्हणतील? त्यांना काय वाटेल? केवळ लोकांच्या मनाचाच विचार केल्यामुळे आपल्या स्वतच्या मनाचा विचार करण्याची शक्तीच हळूहळू हरवून जाते. स्वतचं मन स्वतच्या ताब्यात न राहता इतरांच्या ताब्यात जातं. विचार परावलंबी होतात… आयुष्य प्रवाहपतित होतं. आपण लोकांच्या विचारांबरोबर भरकटत वाहत जातो. वास्तविक पाहता लोकांना कशाचंच सोयरसुतक नसतं. त्यांना केवळ बोलायचं तेवढंच ठाऊक असतं. बोलणारे लोक कधीही मदतीला धावून येत नाहीत आणि मदत करणारे कधीही समोरच्याचं मन खच्ची होऊ देत नाहीत. बोलणारे लोक बोलले तरी ते किती दिवस बोलतील…? दोन दिवस… चार दिवस… बस्स!
त्यानंतर त्यांना दुसऱया कुणाचा तरी नवीन विषय सापडलेला असतो आणि ते त्याच्यावर बोलायला लागतात… आपण मात्र हाताशी आलेली चांगली संधी गमावून बसतो.
याच पार्श्वभूमीवर आजची कविता. कवी आहेत आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे. भा.रा. तांबे आणि कवितादेखील सगळ्यांच्या परिचयाचीच आहे.
जन पळभर म्हणतील हाय हाय…
कोणतंही काम करताना आपल्या मनाचा कौल घ्यायचा. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून फक्त आतला आवाज ऐकायचा. ज्यांनी लोकांचा विचार न करता फक्त आतला आवाज ज्यांनी ऐकला त्यांनी इतिहास घडवल्याची अनेक उदाहरणं आहेत.
आनंदीबाई जोशी… लोक काय म्हणतील याची पर्वा न बाळगता नेटाने शिकल्या.
डॉक्टर झाल्या.
इतरांसारखी नोकरी एके नोकरी नाकारून स्वतच्या मनाचा कौल घेणारे धीरुभाई अंबानी.
विधवेसोबत लग्न केलं तर लोक काय म्हणतील?’ याचा विचार न करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे.
स्त्रियांच्या शिक्षणासाठी तत्कालीन समाजाशी लढणारे महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले.
या सगळ्यांनी फक्त स्वतच्या मनाचा कौल घेतला आणि जिद्दीने लढले. इतिहास निर्माण केला. लोक बोलतील… फक्त चार दिवस बोलतील… त्यांच्या मनाचा विचार करून आपल्या आयुष्यातल्या आनंदाच्या संधी कधीच दवडायच्या नाहीत.
जर कधी आपल्या आयुष्यात असा प्रसंग आला तर भा. रा. तांबेंची ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ही कविता आठवायची आणि हिंदीतल्या या गाण्याचे शब्ददेखील आठवायचे.
कुछ तो लोग कहेंगे… लोगोंका काम है कहेना…
जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जातां राहील कार्य काय ।।
सूर्य तळपतील चंद्र झळकतील
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील
होईल काहिं का अंतराय ।।1।।
मेघ वर्षतील शेते पिकतील
गर्वाने या नद्या वाहतील
कुणा काळजी कीं न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय ।।2।।
सगे सोयरे डोळे पुसतील
पुन्हा आपल्या कामी लागतील
उठतील बसतील हसुनि खिदळतील
मी जाता त्यांचे काय काय ।।3।।
रामकृष्णही आले गेले
तयां विना हे जग ना अडले
कुणीं सदोदित सूतक धरिले
मग काय अटकते मजशिवाय ।।4।।
अशा जगास्तव काय कुढावे
मोहिं कुणाच्या कां गुंतावे
हरिदूता कां विन्मुख व्हावे
कां जिरवु नये शांतीत काय ।।5।।