नृसिंहवाडीत गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी

36

सामना प्रतिनिधी । शिरोळ

शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ‘श्री गुरुदेव दत्त’ च्या जयघोषात हजारो भावीकांच्या उपस्थितीत मंगळवारी गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच दत्तभक्त नृसिंहवाडीमध्ये दाखल होत होते. अनेक भक्तांनी काकड आरतीपूर्वीच कृष्णा नदीत स्नान केले आणि दत्तदर्शनासाठी रांगेत उभे होते.

पहाटे 4.30 वाजता काकडआरती करण्यात आली. त्यानंतर 8 ते 12.30 वाजेपर्यन्त अभिषेक आणि पंचामृत स्नान आदी विधी करण्यात आले. त्यानंतर श्री पादुकेवर षोडशोपचार महापुजा करण्यात आली. 3 वाजता पवमान पठण करण्यात आले.
मंगळवारी खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने कर्क संक्रमणाचा प्रारंभ दुपारी 4.33 वाजता झाला. संध्याकाळी 7.06 वाजता त्याची समाप्ती झाली. सायंकाळी 7:30 धूप-दीप आरती, इंदुकोटी काढण्यात आली. 9.30 वाजता शेजारती करून मंदिर बंद करण्यात येणार आहे. 17 तारखेला पहाटे 1.30 वाजता काकड आरती व श्री ग्रहण स्पर्श स्नान तर पहाटे 4.30 वाजता श्रीं ना ग्रहण स्पर्श मोक्ष स्नान करण्यात येणार आहे.

भाविकाना सुलभतेने दर्शन होण्याकरता उड्डाण पूल रांगेबरोबरच मुखदर्शन रांगेची सोय करण्यात आली होती. येथील वेदपाठशाळेतील अवधुत शास्त्री बोरगावकर यांच्या घरी व्यासपूजनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. चातुर्मासानिमित्त पालखी सोहळा बंद झाला असून विजया दशमीला पालखी सोहळ्याला पुन्हा सुरुवात होणार आहे, अशी माहिती दत्त देवस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण पुजारी व सचिव अमोल पुजारी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या