भटकंती – हिंदुस्थानातील भुलोका वैकुंठम

>> वर्षा चोपडे

भुलोका वैकुंठम म्हणजे काय तर हिंदू देवता लक्ष्मीनारायणाचे निवासस्थान. पवित्र, स्वर्गीय ईश्वरी धाम. आपल्या विठोबाचे भक्त जिथे मुक्ती मिळवण्यासाठी जातात ते स्थान. केरळातील गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर अद्भुत कलाकुसर असलेले अत्यंत भव्य मंदिर आहे. हे मंदिर केरळच्या शिरपेचातील मोरपीस आहे.

कोची ते गुरुवायूर मंदिर 88 किलोमीटर आहे आणि त्रिवेंद्रमपासून उत्तर-पश्चिम दिशेला 292 किमी अंतरावर आहे. हे मंदिर त्रिशूर शहराचे उपनगरीय शहर आहे. हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे व प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हिंदूंच्या हृदयात या मंदिराला एक विशेष स्थान आहे. कारण भगवान कृष्णाचे जागृत देवस्थान म्हणून ते प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वासोबतच हे मंदिर त्याच्या भव्य पारंपरिक वास्तूकलेसाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. पवित्र घंटानाद, फुलांच्या विविध माळा, भक्तीने भारावलेले वातावरण व स्वच्छता बघून मन उल्हासित होते. या मंदिराची विशेषतः अशी की, केवळ हिंदूंना या मंदिरात प्रवेश आहे.

मंदिर पारंपरिक केरळ शैलीत बांधलेले असून मंदिराशेजारी भले मोठे तळे आहे. कृष्ण मंदिराचा बाहेरील भाग सोन्याने मढवलेला आहे आणि त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. दीपमाळ तर खूप आकर्षक, सुंदर आहे. गाभाऱ्यातील दैवी कृष्णमूर्ती प्रसन्न मुद्रेत असून दिव्याच्या प्रकाशात भगवान कृष्ण साक्षात दर्शन देत असल्याचे जाणवते. तुळशी हार, शंख पांचजन्य, चकती सुदर्शन चक्र, गदा कौमोदकी आणि कमळ घेऊन चार हात असलेल्या विष्णू देवतेचे रूप बघून मन भक्तीने भावविभोर होते. आत भिंतीवर सुबक कृष्ण पेंटिंग्स तसेच गणेश, अय्यप्पन आणि भगवती यांची उप-तीर्थस्थाने आहेत. तसेच संकुलाच्या बाहेरील मंदिराखाली गणेश आणि नागदेवतांची दोन तीर्थस्थाने आहेत. ईश्वराचे अस्तित्व जाणवणाऱ्या या मंदिरात अनेक नामांकित व्यक्तींची वर्दळ असते.

हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान कृष्णाने द्वारकेमधील मंदिरातील मूळ कृष्ण मूर्ती पुरामुळे नष्ट होऊ नये म्हणून देवता आणि ऋषींना केरळमध्ये स्थापित करण्यास सांगितले होते. त्यानुसार ऋषी बृहस्पतींनी कृष्ण मूर्ती गुरुवायूर मंदिरात स्थापना केली असे मानले जाते. ही मूर्ती स्वयंभू असल्यामुळे हिंदू भक्तांसाठी तिचे विशेष महत्त्व आहे. सुट्टीच्या दिवशी या मंदिरात खूप गर्दी असते, पण इतर दिवशी लवकर दर्शन होते. महिलांना साडी घालणे आणि पुरुषांना पांढरे धोतर (मुंडु) घालणे बंधनकारक आहे. महिलांनी पंजाबी ड्रेस घातला तर त्यावर मंदिराशेजारील दुकानातील साडी घेऊन ती लपेटली तरी चालते, पण पांढरी साडी हवीच.

गुरुवायूर एकादशी हिंदूंसाठी खूप शुभ आहे. वर्षातील 24 एकादशींपैकी वृश्चिका शुक्ल पक्ष एकादशीला गुरुवायूर मंदिरात विशेष महत्त्व आहे. गुरुवायूरमध्ये गजराजन केशवन म्हणजे केरळातील प्रसिद्ध मानाच्या हत्तीचा पुतळा असून याला आदर म्हणून कार्यक्रम आयोजित केला जातो. करणवर किंवा हत्ती कुटुंबाचे प्रमुख श्रीवलसम गेस्ट हाऊससमोरील केशवनाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात आणि इतर सर्व हत्ती आजूबाजूला उभे राहून नमस्कार करतात. एकादशीच्या दिवशी उदयस्थान पूजा (पहाटे ते संध्याकाळची पूजा) पारंपरिक पद्धतीने केली जाते. पहाटेच्या शिवेलीनंतर एकादशीला पार्थसारथी मंदिरात भव्य हत्तीची मिरवणूक निघते. कारण हा दिवस गीतोपदेशम म्हणूनही ओळखला जातो. रात्रीच्या पूजेनंतर एकादशीला प्रसिद्ध एकादशी विलक्कूची हत्तीची मिरवणूक निघते. हा सोहळा विलोभनीय असतो. देवतेला संगीत आणि नृत्याने अभिवादन केले जाते. त्यासाठी चेंबई वार्षिक संगीतोल्सवम हा कर्नाटक शास्त्रीय संगीतातील एक प्रमुख उत्सव सादर केला जातो. हा उत्सव सुमारे 12-15 दिवस चालतो.

याशिवाय मंदिराच्या तीन किमी अंतरावर कोट्टापाडी येथे स्थित एक किल्ला आणि पूर्वीचा राजवाडा आहे. तसेच मम्मीयुर महादेवाचे मंदिर, श्री पारधसाराधी मंदिर, कृष्णनट्टम मंदिर बघण्यासारखे आहे. आपला देश, आपली संस्कृती, आपली मंदिरे केरळवासीयांनी पारंपरिकरीत्या जपली हे प्रशंसनीय आहे.

[email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)