प्रिमिक्स गुटखा घेऊन जाणारा कंटनेर पकडला, 62 लाखांचा मुद्देमाल जप्त

531

जालन्याच्या एडीएस पोलिसांनी प्रिमिक्स गुटखा घेऊन जाणारा कंटनेर पकडला असून तब्बल 62 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एडीएसचे प्रमुख यशवंत जाधव यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, कंटनेर क्र. (आरजे-14-जीजे-8550) मध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या तंबाखुजन्य गुटखा भरुन संभाजीनगर रोडकडून बीडकडे जात आहे. त्यानुसार, तत्काळ एक पथक तयार करून संभाजीनगर ते बीड रोडवर पाठविले. सदर कंटनेर हा बारसवाडा फाटा राजस्थान ढाब्याजवळ दिसताच चालकास थांबवण्याचा इशारा करुन त्यास थांबविले. त्यास परिचय करुन देवून चालकास नाव गाव विचारले असता त्याने हामीद खान माजीद खान (रा. आमीरनगर ता. तिजारा जि. अलवर- राजस्थान) असे सांगितले.

कंटनेर मालक अब्दुल गणी उस्मान रा. हाऊस नं. 405 बिजोपूर-35, फरीदाबाद, हरियाणा-121004 असे सांगितले. त्यास कंटनेरमध्ये काय माल आहे असे विचारले असता त्याने प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सांगितले की, सदर कंटनेरमध्ये इतर पर्रच्युटन मालासह 36 गोण्यामध्ये गुटखा प्रिमिक्स भरलेला आहे. सदरचा माल हा दिल्ली येथून भरला असून सदर माल कोठे चालला आहे सांगितले नाही.

पथकातील पोलीसांनी कंटनेरची तपासणी केली असता 36 गोण्या तंबाखुजन्य गुटखा प्रिमिक्स प्रत्येकी 70 किलो वजनाच्या 2550 किलो ज्याची किंमत 1 हजार 500 रुपये प्रमाणे 37 लाख 80 हजार रुपयांचा व एक कंटनेर किंमत रुपये 25 लाख असा एकूण 62 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पो हे कॉ. ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण, अनिल काळे, तसेच अन्न भेसळ विभागाचे सहायक आयुक्त साहेब देसाई, प्रज्ञा सुरसे, संजय कट्टे, प्रमोद शुक्ला यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या