मलकापूरकडे जाणारा गुटख्याचा ट्रक जालन्यात पकडला; 65 लाखांचा मुद्देमाल जप्त

418

कर्नाटकातून मलकापूरकडे जालना जिल्ह्यातून जाणारा गुटख्याचा ट्रक भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलिसांनी पकडला. गुटखा व ट्रकसह 65 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जालना जिल्ह्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके कर्मचाऱ्यांसह एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना त्यांना जालना ते भोकरदन रोडवर तपोवन पाटीजवळ एक संशयित ट्रक वेगाने जात असल्याचे दिसले. ट्रकचा पोलिसांनी पाठलाग करून तो राजूरजवळ मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पकडला. ट्रकचालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता कर्नाटकातील गुलबर्गा येथून गुटखा घेऊन बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर येथे जात असल्याचे सांगितले. या ट्रकमध्ये 50 गोण्या गुटखा आहे. पोलिसांनी गुटख्यासह ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या