
अनेकदा रुग्णांना औषधांपेक्षा मानसिक आधाराची गरज असते. मनातील भीती दूर झाली की अनेकजण बरे होतात. यात डॉक्टरची महत्त्वाची भूमिका असते. रुग्णांना मानसीक आधार देत त्यांच्या मनातील रोगांबाबतची भीती दूर करण्याचे काम डॉक्टर करतात. मात्र, डॉक्टरच स्वतःच्या स्वार्थासाठी रुग्णांना घाबरवायला लागले तर रुग्णांची अवस्था बिकट होते. रुग्णांना घाबरवून शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या एका डॉक्टरला न्यायालयाने तब्बल 465 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. डॉक्टरचा गुन्हा गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
अमेरिकेच्या व्हर्जिनियामधील ही घटना आहे. व्हर्जिनियातील एक स्त्रीरोगतज्ञ त्याच्याकडे येणाऱ्या महिला रुग्णांना घाबरवत गरज नसलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप डॉक्टरवर ठेवण्यात आला आहे. या आरोपाखाली दोषी ठरवत 465 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव जावेद परवेज आहे.
अनेक रुग्णांवर अशा गरज नसलेल्या शस्त्रक्रिया करून डॉ. जावेद याने खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांना लाखो डॉलरचे बिल देत त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे व्हर्जिनियातील न्याय विभागाने म्हटले आहे. 2010 सालापासून त्याचे विनाकारण शस्त्रक्रिया करण्याचे आणि विमा कंपन्यंकडून पैसे उकळण्याचे त्याचे प्रमाण वाढले होते.
गर्भवती महिलांची नैसर्गिक प्रसूती होणार असेल तरी डॉ. जावेद त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देत होता. अनेकदा शस्त्रक्रिया करण्यासाठी तो रुग्णांवर दबावही टाकत होता. तसेच नसबंदीच्या शस्त्रक्रियासाठी असलेल्या नियमांचेही डॉक्टरने उल्लंघन केल्याचे नोंदीवरून दिसून आले. रुग्णाला गरज नसलेल्या अनेक शस्त्रक्रिया करून त्याने विमा कंपन्याकडून लाखो डॉलर्स उकळले आहेत. त्याचप्रमाणे रुग्णांच्या जीवाशी खेळ करत त्यांना मनस्ताप दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे असल्याचे जावेद रुग्णांना सांगत असे. त्यासाठी तो रुग्णांना घाबरवून त्यांच्यावर दबाव टाकत असे. अनेकदा कर्करोगापासून बचाव करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही या डॉक्टरने रुग्णांना दिला आहे. डॉ. जावेद परवेज यांच्यावरील आरोप सिद्ध झाले असून त्यांचा गुन्हा गंभीर आहे. रुग्णांची सेवा करण्याची प्रतिज्ञा करणारे डॉक्टरनेच स्वार्थासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळणे गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. गरज नसलेल्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना डॉक्टरने शारीरिक आणि मानसीक त्रास दिला आहे. याची दखल घेत डॉक्टरला ही शिक्षा सुनावण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.



























































