शंकर नागरी सहकारी बँकेचे 14 कोटी 46 लाख रुपये हॅकर्सनी आयडीबीआयमधून लांबवले; गुन्हा दाखल

शंकर नागरी सहकारी बँकेचे 14 कोटी 46 लाख रुपये त्यांचे खाते असलेल्या आयडीबीआय बँकेच्या शाखेतून हॅकर्सनी मागच्या आठवड्यात लंपास केले होते. या प्रकरणी सोमवारी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली असून एसआयटी प्रमुख पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांना नियुक्त करण्यात केले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने सायबर गुन्ह्यांबाबत तज्ञ असलेल्या एका व्यक्तीला नांदेड येथे पाठवले आहे.

शंकर नागरी सहकारी बँकेचे व्यवस्थापक विक्रम राजे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि वजिराबाद पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे आयडीबीआय या बँकेत खाते होते. शंकर नागरी बँकेच्या खात्यातून 289 विविध खात्यांमध्ये 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये आरटीजीएस या पध्दतीने वळविण्यात आले आहेत. ही चूक आयडीबीआय बँकेची आहे. आमचे पैसे परत मिळवून द्यावेत, असे अर्जात म्हटले आहे. याबाबत त्यावेळी पोलिसांनी सायबर तज्ञ याची तपासणी करतील आणि त्यानंतर गुन्हा दाखल होईल असे सांगितले होते. सोबतच हॅकर्सने गायब केलेल्या रकमेचा विमा होता. त्यामुळे याबाबत विविध चर्चा होत असून तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

पोलीस महासंचालक कार्यालयात सायबर विषयीच्या गुन्ह्यांसाठी एक व्यक्ती कार्यरत आहे. त्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाने नांदेड येथे झालेल्या या 14 कोटी 50 लाखांच्या हॅकींग तपासणीसाठी पाठविले होते. त्यांनी नांदेडला आल्यानंतर पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी या साडेचौदा कोटीच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली. या एसआयटीचे प्रमुख शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांना नियुक्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात 289 खात्यांमध्ये हे 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत. कोठे चुक झालेली आहे आता हे पोलिसांना शोधायचे आहे. या संदर्भाने शंकर नागरीचे व्यवस्थापक विक्रम राजे यांनी सोमवारी दिलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आयडीबीआय बँकेतून अशाच प्रकारे हॅकर्सच्या माध्यमातून निफाड, नाशिक, नगर, धुळे येथील काही नागरी बँकांतून मोठ्या प्रमाणात रक्कमा लंपास करण्यात आल्या होत्या. मात्र केवळ धुळे वगळता अन्य बँकांच्या हॅकींग प्रकरणात अद्यापही तपास सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या