
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या तब्बल 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ मतदान न मोजता मॉक पोलद्वारे मतदान मोजण्याचा पर्याय उमेदवारांसोबत ठेवला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक आयोगाने हडपसर मतदार संघातील 27 केंद्रांवरील प्रत्यक्ष झालेल्या मताची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 25 जुलै रोजी भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप केला होता. जगताप यांनी हडपसर मतदारसंघातून ज्या संशयास्पद 27 ईव्हीएम मशीन तपासणीसाठी 12 लाख 74 हजार रुपये निवडणूक आयोगाकडे भरले होते. त्यानंतर या 27 मशीन मोजण्यास निवडणूक आयोगाने सकारात्मकता दाखवली होती. मात्र, त्यांचे मूळ मतदान न मोजता मॉक पोल घेऊन त्या मशिनची पडताळणी करण्यात येणार होती. त्या विरोधात काही उमेदवार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते. त्यानंतर आता या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे.
आता 25 जुलैपासून हडपसर विधानसभा मतदारसंघातील ज्या 27 मशीनबाबत आम्ही आक्षेप नोंदवला आहे. त्याची मतमोजणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार ईव्हीएम मधील मतदान आणि व्हीव्हीपॅट मोजले जाणार आहेत. आठ दिवस ही प्रक्रिया सुरू असणार आहे. या निर्णयामुळे हरकत घेतलेल्या अन्य विधानसभा मतदारसंघातील फेर मतमोजणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.