हाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता!

57

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

गेली 10 वर्षे शोधल्यानंतर दहशतवादी हाफीज सईदला पकडण्यात पाकिस्तानी सरकारला यश आले या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचा अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीने चांगला समाचार घेतला. समितीने म्हटले, ‘सईद हा गेली 10 वर्षे पाकिस्तानमध्ये सर्वसामान्यांप्रमाणे मुक्तपणे फिरत होता. त्याला कित्येक वेळा अटक केली गेली आणि सोडण्यात आले.’ त्याबरोबर त्यांनी सईदला पकडल्याच्या तारखाही दिल्या आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचा खोटा दावा त्यांच्यावरच उलटला आहे.

पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने हाफीज सईदला काल गुजरांवालामध्ये दहशतवादाला पैसे पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली. मात्र, ही अटक म्हणजे पाकिस्तानचे निव्वळ नाटक आहे, अशी प्रतिक्रिया हिंदुस्थानसह जगभर उमटत आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी हाफीजच्या अटकेवर ‘10 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार हाफीजला अटक केली. त्याला अटक करावी, यासाठी गेली दोन वर्षे अमेरिकेने प्रचंड दबाव टाकला होता’ अशी प्रतिक्रिया ट्विटरवर दिली होती. त्यांचा हा दावा किती खोटा आहे, हे आज समितीने दाखवून दिले आहे. अमेरिकेने हाफीजला जागतिक दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर 1 कोटीचे बक्षीस लावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या