ट्रक घरात शिरला, झोपलेल्या दोघांचा जागीच मृत्यू; पोंभुर्णा तालुक्यातील घटना

980

चंद्रपूर येथील पोंभुर्णा येथे गिट्टी भरलेला हायवा ट्रक घरात शिरल्याने अपघात होऊन दोन जम मृत्युमुखी पडले आहेत. ही घटना पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणा येथे सकाळी पाच वाजता घडली. हायवा घरात घुसल्याने घरातील खाटेवर झोपलेल्या दोन जण त्यामुळे चिरडले गेले. उमाजी तिवाडे (40) आणि देविदास वासूदेव झगडकर (45) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत. या घटनेने गावकरी संतापले असून त्यांनी रास्तारोको केला आहे.

शेतीचा कामानिमित्त देविदास झगडकर, उमाजी तिमाडे हे चेकठाणा येथे आले होते. उशिर झाल्याने ते चेकठाणा येथिल नातेवाईक सोनटक्के यांच्या घरी झोपी गेले होते. घराच्या पहिल्या खोलीत झगडकर आणि तिवाडे झोपले होते. तर आतील खोलीत सोनटक्के यांचे कुटुंब झोपले होते. रविवारी पहाटे पाच वाजता नंदोरी येथून गिट्टीने भरलेला भरधाव हायवा ट्रक विठ्ठलवाडाकडे निघाला होता. हायवा चालकाला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले अन सोनटक्के यांचा घरात हायवा शिरला.

या अपघातात झगडकर, तिवाडे यांचा घटस्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रास्तारोको केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून आरोपीचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या