दिल्ली बाॅम्बस्फोटात एनआयएचा मोठा खुलासा, हमाससारखा ड्रोन हल्ला करण्याचा होता डाव

राष्ट्रीय तपास संस्थेने ( एनआयए) दिल्लीत हमास शैलीतील ड्रोन हल्ल्यांचा एक मोठा दहशतवादी हल्ला उधळून लावला आहे. दहशतवादी उमर नबी, एक डॉक्टर, आणि त्याचे सहकारी ड्रोन आणि रॉकेट वापरून हिंदुस्थानातील प्रमुख शहरांमध्ये हवाई बॉम्बस्फोट करण्याची योजना आखत होते. या कटाच्या सूत्रधारांमध्ये जैश -ए-मोहम्मदचा सदस्य जसीर बिलाल वाणी उर्फ ​​दानिशचा समावेश होता , ज्याला अलीकडेच श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली होती. दानिश बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ होता आणि तो फरिदाबाद मॉड्यूलला तांत्रिक मदत पुरवत होता.

एनआयएच्या तपासात असे समोर आले आहे की दहशतवाद्यांनी हमासप्रमाणेच ड्रोन हल्ल्याची योजना आखली होती. एनआयएने सोमवारी या प्रकरणात आणखी एक अटक केली. या अटकेतून असे उघड झाले की दहशतवादी मॉड्यूल ड्रोन आणि रॉकेटचा वापर करून हमास शैलीतील दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होते. जैश-ए-मोहम्मद मॉड्यूल लहान रॉकेट तयार करण्याची तयारी देखील करत होते, जे दहशतवादी नियोजित मालिकेतील स्फोटांमध्ये वापरणार होते.

एनआयएच्या तपासात असे दिसून आले आहे की दिल्ली बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलने १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी ड्रोनमध्ये बदल करून त्यांना शस्त्रांमध्ये रूपांतरित करण्याची आणि वापरासाठी रॉकेट बनवण्याची योजना आखली होती.