घरफोडय़ा करणारा हॅण्डसम चोरटा गजाआड,दुपारी 12 ते 4 मध्ये हातसफाई

1443

उच्च राहणीमान, कॅबमधून परिसरात फिरून भरदुपारी 12 ते 4 च्या दरम्यान वाऱयाच्या वेगाने घरफोडी करून पसार होणाऱया एका सराईत हॅण्डसम नेपाळी चोराच्या गुन्हे शाखा युनिट-3 ने मुसक्या आवळल्या. नवी मुंबईत घरफोडी करण्याच्या तयारी असताना पोलिसांनी त्याला उचलले. राहुल थापा (40) असे त्याचे नाव असून त्याच्यावर 30 हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत दिवसा घरफोडय़ा करणारा एक सराईत चोरटा गुरुवारी ऐरोली येथे घरफोडी करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यानुसार युनिट-3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन पाटील, उपनिरीक्षक नवनाथ उघडे, राजेंद्र बागल, तसेच रमेश गावीत, राजेंद्र जगदाळे, भास्कर गायकवाड आदींच्या पथकाने ऐरोली परिसरात सापळा रचून टापटीप कपडे घालून कॅबने ऐरोली येथे घरफोडी करण्यासाठी आलेल्या राहुल थापावर झडप घातली. त्याला अटक करून त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला असता तो वर्ष 2007 पासून घरफोडीचे गुन्हे करीत असून 2007 ते 2008 दरम्यान त्याने अन्य साथीदारांसह पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 घरफोडय़ा केल्याचे समोर आले. 2010 मध्ये तो जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडय़ा करण्यास सुरुवात केली. थापा विरोधात मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यांत 30 हून अधिक गुह्यांची नोंद आहे. तसेच यापूर्वी त्याच्याकडून गुह्यातील 25 लाखांचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, घडय़ाळे, इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले होते.

वृद्ध वॉचमन, सीसीटीव्ही नाही अशा ठिकाणी चोरी

थापा वेगवेगळ्या परिसरात रेकी करतो आणि ज्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही नाही तसेच जेथे वृद्ध वॉचमन आहेत अशा इमारतींमधील घरांना टार्गेट करतो. भरभक्कम शरीरयष्टीचा थापा चांगले कपडे घालून आणि कॅब करून चोरी करायच्या ठिकाणी जात असल्यामुळे त्याचा कोणाला संशय येत नाही. याचाच फायदा उचलत तो इमारतीत घुसतो आणि टार्गेट केलेले घर फोडून चोरी करतो अशी थापाची गुह्याची पद्धत असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या