सिडनीत हनुमा विहारीने दाखवली जिगर; लंगडत धावा काढत सामना अर्निणीत राखण्यात यश

हिंदुस्थान आणि ऑस्टेलियामध्ये सिडनीच्या मैदानावर झालेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. हा सामना ऑस्टेलियाकडून खेचून घेत अर्निणीत राखण्यात आर. अश्विन आणि हनुमा विहारीचे मोठे योगदान आहे. या सामन्यात विहारीने खेळाडूपणा आणि जिगर यांचे दर्शन घडवल्याने क्रिकेटप्रेमी त्यांचे चाहते झाले आहेत. दोघेही दुखापतग्रस्त असताना त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विहारीने लंगडत धावा काढत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. अश्विन आणि विहारीने 256 चेंडूत 62 धावांची दमदार भागीदारी केली.

हनुमा विहारी दुखापतग्रस्त झाल्यानंतरही 161 चेंडूत त्याने 23 धावा फटकावल्या. दुसऱ्या डावात विहारीला दुखापत झाली होती. तरीही तशाच अवस्थेत सामना खेळत लंगडत धावा करत त्याने सामना अनिर्णित राखला आहे. त्याच्या या जिगरचे आयसीसीनेही कौतुक केले आहे. आयसीसीने ट्विट करत कसोटी सामन्याच्या पाचव्या शेवटच्या दिवशी विहारीचा खिलाडूवृत्ती आणि त्याच्या जिगरचे कौतुक केले आहे.

चार सामन्यांची ही कसोटी मालिका आता उत्कंठावर्धक होत आहे. 15 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये होणारी कसोटी मालिका निर्णायक ठरणार आहे. हा सामना जिकणार संघ मालिकेचा विजेता ठरणार आहे. या चौथ्या कसोटी सामन्यात टिम इंडियाला विजयासाठी 407 धावांची गरज होती. मात्र, चौथ्या दिवशी रोहित शर्मा (52) आणि शुभमन गिल (31) धावांवर बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित वाटत असताना टिम इंडियाने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले आहे.

पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार अंजिक्य रहाणे तंबूत परतला. त्यामुळे ऑस्टेलिया लवकरच सामना जिंकण्याची शक्यता होती. मात्र, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतने चौथ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. पुजारा 205 चेंडूत 77 धावा करून बाद झाला. तर पंतने 118 चेंडूत 97 धावा केल्या. त्याचे शतक थोडक्यात हुकले. त्यानंतर हनुमा विहारी आणि अश्विनने सामना अनिर्णित राखण्याची कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टिम इंडियाने पाच गड्यांच्या मोबदल्यात 334 धावापर्यंत मजल मारली.

ऑस्ट्रेलियाने विहारी-अश्विन यांची जोडी फोडण्यासाठी पराकठीचे प्रयत्न केले. कर्णधार पेन यानं तर स्लेजिंगचाही वापर केला. मात्र, अश्विन-विहारी यांनी सावध खेळी करत सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवू न देता सामना अनिर्णित राखला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या