Birthday – कराटेतील ‘ब्लॅक बेल्ट’ ते क्रिकेटमधील ‘मिस्टर डिपेंडेबल’, जाणून घ्या रहाणेबाबत खास गोष्टी

1231

टीम इंडियाचा मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज मराठमोळा अजिंक्य रहाणे याचा आज 32 वा वाढदिवस आहे. 6 जून 1988 ही रहाणेची जन्मतारीख. कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानच्या फलंदाजीचा कणा असलेल्या रहाणेला ‘मिस्टर डिपेंडेबल’ही बोलले जाते. 2011 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रहाणेने आतापर्यंत 65 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 लढती खेळल्या आहेत. यात त्याने 14 शतक ठोकली आहेत. यातील 11 कसोटीत आणि 3 शतक एकदिवसीय क्रिकेटमध्ये झळकवली आहेत.

अजिंक्य रहाणेला एक चांगला आणि यशस्वी क्रिकेटपटू म्हणून घडवण्यात त्याची आई सुजाता यांचा मोलाचा वाटा आहे. लहानपणी क्रिकेट कॅम्पला जाताना रहाणेची आई देखील त्याच्यासोबत 2 किलोमीटर चालत यायची. त्याकाळी आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने वडिलांनी रहाणेला क्रिकेट सोडण्यास सांगितले, मात्र आईने मुलाला पाठिंबा दिला. आईच्या त्या निर्णयामुळे एक गुणी खेळाडू टीम इंडियाला लाभला.

लहानपणीच किस्सा 
रहाणे 8 वर्षाचा असताना मुंबईत डोंबिवली येथे सराव करायचा. सरावादरम्यान एका गोलंदाजांचा बाऊन्सर त्याच्या हेल्मेटवर आदळला. मात्र आपले संतुलन न ढळू रहाणेने त्याच गोलंदाजाला पुढच्या पाचही चेंडूवर चौकार ठोकले होते.

प्रथमश्रेणी क्रिकेटच्या पदर्पणात शतक
रहाणेने आपला प्रथमश्रेणीच्या पदर्पणाचा सामना पाकिस्तानात खेळला होता. 19 व्या वर्षी रहाणेची मुंबईच्या संघात निवड झाली आणि कराची येथे त्याने आपला पहिला सामना खेळला. कराची अरबन संघाविरुद्ध खेळताना पहिल्याच लढतीत रहाणेने सलामीला येत 143 धावांची शतकी खेळी केली होती.

कसोटीच्या दोन्ही डावात शतक
फलंदाजांच्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात शतक ठोकण्याचा कारणामा रहाणेने केला आहे. अशी कामगिरी करणारा तो टीम इंडियाचा सहावा फलंदाज आहे. 2015 ला दिल्ली कसोटीत श्रीलंकेविरुद्ध त्याने हा विक्रम केला होता.

ajinkya-rahane-test

100 टक्के यश
रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. रहाणेने 3 एकदिवसीय लढतीत कर्णधारपद भूषवले असून या तिन्ही लढतीत टीम इंडियाचा विजय झाला आहे.

ajikya-rahane17

लोर्ड्सवर शतक
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोर्ड्स मैदानावर शतक ठोकणारा रहाणे टीम इंडियाचा नववा खेळाडू आहे. रहाणे आधी राहुल द्रविड, दिलीप वेंगसरकर, अजित अगरकर, सौरव गांगुली, रवि शास्त्री, मोहम्मद अजहरुद्दीन, गुडप्पा विश्वनाथ आणि वीनू मांकड या हिंदुस्थानी खेळाडूंनी येथे शतक ठोकले आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांनाही येथे शतक ठोकता आलेले नाही.

ajinkya-rahane

एका कसोटीत सर्वाधिक झेल
एका कसोटीत सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम रहाणेच्या नावावर आहे. 2015 ला श्रीलंकेविरुद्ध रहाणेने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 3 असे एकूण 8 झेल पकडले होते.

rahane-virat

IPL मध्ये एका षटकात 6 चौकार
IPL मध्ये एका षटकात सलग 6 चौकार ठोकण्याचा विक्रम रहाणेच्या नावापुढे आहे. 2012 ला राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्धच्या लढतीत रहाणेने श्रीनाथ अरविंदच्या गोलंदाजीवर सलग 6 चौकार मारले होते.

rahane25

क्रिकेटव्यतिरिक्त रहाणेने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे..2016 ला त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या