
19 सप्टेंबरपासून यूएईत खेळवण्यात येणाऱया आयपीएलसाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघातील खेळाडूंच्या शिबिराला शनिवारपासून चेन्नईत सुरुवात झाली. मात्र या शिबिरास अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा, ऑफस्पिनर हरभजन सिंग व मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर मुकणार आहेत. वैयक्तिक कारणामुळे खेळाडूंनी या शिबिरात न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईतील एम. ए. चिंदबरम स्टेडियममध्ये सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुरेश रैना, दीपक चहर, पीयुष चावला, केदार जाधव हे आधीच येथे दाखल झाले आहेत. महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी येथे आला. हरभजन सिंग, रवींद्र जाडेजा व शार्दूल ठाकूर हे 19 ऑगस्टला चेन्नईत दाखल होणार आहेत.
जिम, स्वीमिंगसाठी परवानगी नाही
खेळाडूंना यावेळी जिम व स्वीमिंग करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच सोमवारी खेळाडूंना आणखी एका कोरोना चाचणीचा सामना करावा लागणार आहे. स्टेडियममधील मुख्य ग्राऊंडवर खेळाडू सराव करणार आहेत. प्रत्येक खेळाडूला त्याच्या नावाने ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या बॉटलमधून पाणी प्यावे लागणार आहे. तसेच यावेळी प्रत्येकाला टॉवेलही देण्यात आला आहे. ड्रेसिंग रूममध्ये एसी ठेवण्यात आलेला नाही.




























































