हार्बरच्या आठ स्टेशनांवर नवे स्कायवॉक आणि ‘इंटर कनेक्टिंग ब्रीज’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील आठ स्थानकांवर नवे स्कायवॉक आणि जोड पादचारी पुलांची लवकरच उभारणी करण्यात येणार आहे.  डॉकयार्ड रोड आणि शिवडी रेल्वे स्थानकांत पादचारी पूल उभारण्यासाठी मोठे कसोटीचे काम असणार आहे. सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, कॉटनग्रीन, रे रोड आणि परळ स्थानकात अनेक अद्ययावत सुविधा उभारण्यात येणार आहेत.

 हार्बरच्या डॉकयार्ड रोड स्थानकांत सीएसएमटीच्या दिशेला पादचारी पूल उभारण्याची योजना आहे. परंतु येथे टेकडीचा भाग असल्याने अडचण अडचण निर्माण झाली आहे. डॉकयार्ड रोड प्लॅटफॉर्म क्र.1 शेजारी टेकडी असून रोडही असल्याने पादचारी पूल उभारण्यात अडचणी आहेत. येथे पालिकेच्या मदतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवडी स्थानकांतही पूल उभारताना झाडांसह अनेक अडचणी आहेत. येथील पादचारी पुलाचा उतार पूर्वेकडे फुटपाथ तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर होणार आहे. त्यामुळेही हा पादचारी पूल उभारण्यात विविध अडचणी आहेत. येथे नवा स्कायवॉक आर.ए. किडवई मार्गाला जोडण्याची योजना आहे.

प्रवाशांसाठी बाहेर व आत जाण्याचे अधिक मार्ग

ज्या स्थानकातील प्रवासी संख्या अलीकडे वाढली आहे, तेथे प्रवाशांसाठी मोकळी जागा तसेच प्रवेश व बाहेर पडण्याचे विविध मार्ग उभारण्याची योजना असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी अलिकडेच हार्बरच्या स्थानकांना भेट देऊन कामांची पाहणी केली होती. प्रभादेवीच्या सध्याच्या पादचारी पुलाला पूर्वेला जोडणी देण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करावा तसेच सीएसएमटीच्या हिमालय पुलाची पालिका आणि रेल्वेने लवकर उभारणी करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

हँकॉक ब्रिजशेजारी स्कायवॉकची उभारणी

 हँकॉक ब्रिजची उभारणी पालिकेमार्फत सुरू असून फझलानी स्पूल पॅम्पससाठी येथील नियोजित उड्डाण पुल ते सँडहर्स्ट रोड स्थानक असा स्कायवॉक उभारण्याची योजना आहे. करीरोड स्थानकात दक्षिण टोकाला बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाला पूर्वेला जोडण्याची योजना आहे. कॉटनग्रीन स्थानकात प्लॅटफॉर्मला लागून असलेल्या जुन्या स्कायवॉकशेजारी पालिका अतिरिक्त स्कॉयवॉक बांधणार आहे. रे रोड स्थानकातील उत्तर दिशेला असणाऱया पादचारी पुलाशी जोडणारा स्कायवॉक बांधण्याची योजना असून रेल्वेने यासाठी मंजुरीदेखील दिली आहे.