
सामना ऑनलाईन, मुंबई
गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला येथे दुपारी साडेचारच्या सुमारास मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने हार्बर सेवा पाऊण तास विस्कळीत झाली. सायंकाळी पिकअवर सुरू होत असतानाच हा बिघाड उत्पन्न झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. मध्य आणि पश्चिम मार्गाच्या गाडय़ाही दिवसभर उशिराने धावत होत्या.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकाजवळ मालगाडी क्रॉस होत असतानाच तिचे इंजिन दुपारी 4.20 वाजता बंद पडल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गांच्या लोकल ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ही मालगाडी ढकलण्याची दुसरे इंजिन बोलवेपर्यंत तब्बल 45 मिनिटांचा कालावधी लागला.
गणेशोत्सवाचा दुसराच दिवस असल्याने गणेशभक्तांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाचा वापर प्रवाशांनी केला. त्यामुळे मुख्य मार्गावरही गर्दीचा भार आला. त्यानंतर सायंकाळी 5.05 वाजता अडकलेले मालगाडीचे इंजिन बाहेर काढण्यास मध्य रेल्वेच्या तंत्रज्ञांना यश आले. त्यानंतर संध्याकाळी कामावरून सुटणाऱ्या प्रवाशांना हार्बरच्या गाडय़ांमधील प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला.



























































