हर्षवर्धन पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत, पुण्यात शरद पवार यांच्याशी बंद दाराआड चर्चा

अजित पवार गट महायुतीत आल्याने इंदापूर मतदारसंघातून विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची अस्वस्थता वाढली आहे. त्यातच त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन बंद दाराआड जवळपास दोन तास चर्चा केली. यामुळे हर्षवर्धन पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

इंदापूर विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे तयारी करत आहेत. महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आपला वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मंगळवारी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये एक बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी शरद पवार यांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत केल्याने हर्षवर्धन पाटील लवकरच भाजपला रामराम करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान पाटील यांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. इंदापूरबाबत फडणवीस काय निर्णय घेतायत याची मी वाटत बघत आहे, असे ते म्हणाले.

हे नेतेही भाजपची साथ सोडणार

पश्चिम महाराष्ट्रातील कागलचे समरजितसिंह घाटगे यांच्यापाठोपाठ अकलूजचे रणजितसिंह मोहिते-पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, पुण्यातील बापू पठारे आणि भुईंजचे मदन भोसले लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.