हरयाणात खट्टर मंत्रिमंडळाचा विस्तार

347

हरयाणात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप-जजपा युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा गुरुवारी विस्तार झाला. 6 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्र्यांनी या वेळी मंत्री पदाची शपथ घेतली. यात भाजपच्या आठ तर जननायक जनता पार्टीच्या एका मंत्र्याचा समावेश आहे. त्याचबरोबर एका अपक्ष आमदारालाही मंत्री पदाची लॉटरी लागली आहे.

हरयाणात सर्वाधिक 40 जागा जिंकलेल्या भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीच्या साथीने बहुमताचा 45चा आकडा गाठला. सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांच्यासोबत केवळ उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर गुरुवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन एकूण 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात अनिल विज, कंवरपाल गुर्जर, मूलचंद शर्मा, रणजित सिंह चौटाला, जे.पी. दलाल, बनवारी लाल या कॅबिनेट मंत्र्यांचा, तर ओमप्रकाश यादव, कमलेश ढांडा, अनूप धानक, संदीप सिंह या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यातील वीज हे आधीच्या सरकारमध्येसुद्धा कॅबिनेट मंत्री होते. 33 वर्षीय संदीप सिंह यांनी हिंदुस्थानच्या हॉकी संघाचे कर्णधार पद सांभाळलेले आहे. त्यांनी पिहोवा मतदारसंघात भाजपला 53 वर्षांनंतर विजय मिळवून दिला होता.

जजपाचे आमदार 10, सूत्रे मात्र 11 विभागांची
पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या जननायक जनता पार्टीचे (जजपा) 10 आमदार निवडून आले. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांची साथ मिळाल्याने भाजपने त्यांच्याकडे 11 महत्त्वाच्या विभागांची सूत्रे सोपवली आहे. यात उत्पादन शुल्क, उद्योग, कामगार, नागरी उड्डाण, लोक निर्माण, विकास आणि पंचायत, पुरातत्त्व संग्रहालय, मदत आणि पुनर्वसन या विभागांचा समावेश आहे. भाजपने स्वत:कडे गृह, अर्थ, कृषी, शहर आणि नगरनियोजन हे विभाग ठेवले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी म्हणजेच बुधवारी हे विभागवाटप झाले.

आपली प्रतिक्रिया द्या