
अहिल्यानगर शहरातील हिंदू युवकांची वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी दिशाभूल सुरू आहे. त्यांच्या हातात लाठ्या, काठ्या दिल्या जात आहेत. उच्च दर्जाचे शिक्षण, पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार देण्याऐवजी तरुणांना तुरुंगात जाण्यासाठी भडकाऊ वक्तव्य करत चिथावणी दिली जात आहे. आपल्यातले दोन-चार आत गेले तर काही फरक पडत नाही, असं म्हणणाऱ्यांच्या घरातला एक तरी कधी हिंदुत्वासाठी आत गेलाय का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. निष्पाप तरुणांना जेलमध्ये जाण्याची चिथावणी देण्यापेक्षा चार, दोन हिंदू युवकांना याच शहरात रोजगार द्या, असा सल्लाही काळे यांनी दिला आहे.
शहरीतील लोकप्रतिनिधींनी आपल्यातले चार-दोन आत बसले तर काही फरक नाही पडत असं वक्तव्य केलं होतं. त्याचा समाचार काळे यांनी घेतला. काळे म्हणाले, तुरुंगात जाऊन कुठल्या हिंदू युवकाचं करियर होऊ शकत नाही. सावित्रीबाई, महात्मा फुले यांनी सुसंस्कृत महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. अहिल्यानगरच्याच ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेत प्रशिक्षणाचे धडे गिरवले. देशाला संविधान बहाल करणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याच भूमीत हिंसाचारासाठीची चिथावणी तरुणांच्या भवितव्याची राख रांगोळी करणारी आहे, असे काळे म्हणाले.
शहराची एमआयडीसी ओस पडली आहे. शहरातल्या दहशत, गुंडगिरीच्या आणि अलीकडील काळातील जातीय, धार्मिक तणावाच्या परिस्थितीमुळे कोणतीही मोठी कंपनी यायला तयार नाही. राज्यासह देशात सत्ता असणाऱ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी शहरात आहेत. मात्र कोणताही इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प त्यांना अजून आणता आलेला नाही. परिणामी रोजगारासाठी हजारो युवक, युवतींचे कायमस्वरूपी स्थलांतर पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, चाकण, छत्रपती संभाजीनगर, बेंगलोर, चेन्नई या ठिकाणी होत आहे. आपल्या वयोवृद्ध आई-वडिलां पासून त्यांची ताटातूट होत आहे. पेन्शनर्स लोकांचे शहर म्हणून शहर दुर्दैवाने नावा रूपाला येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकल्पांचे काय झाले ?
काळे म्हणाले, विकासाच्या रखडलेल्या प्रकल्पांचे काय ? पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे काम रखडले आहे. शासकीय मेडिकल कॉलेजची उभारणी होत नाही. अहिल्यानगर – पुणे इंटरसिटी रेल्वे प्रकल्प पुढे सरकत नाही. नगर शहरा लगत एमआयडीसी साठीच्या क्षेत्राची नुसतीच घोषणा झाली. त्याचे पुढे काय झाले ? अहिल्यानगर – मनमाड रोड, नगर – छत्रपती संभाजी नगर रोड दुरावस्थे मुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्य गोरगरीब नगरकरां साठीच्या मनपाच्या हॉस्पिटल उभारणीच्या प्रकल्पाचे पुढे काय झाले ? शहरातली रखडलेली दीडशे कोटींची रस्त्यांची कामं पूर्ण कधी होणार ? शहराच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसाठी कोणता मास्टर प्लॅन सत्ताधाऱ्यांकडे आहे का ? लाडकी बहीण योजनेचा थकलेला हप्ता कधी मिळणार ? सरकारने दिवाळीच्या आनंदाचा शिधा अजून का वाटला नाही ? पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज कधी मिळणार ? कर्जमाफी कधी होणार ? शहराच्या, जिल्ह्याच्या या असंख्य प्रलंबित प्रश्नांबद्दल लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. जनतेने या कामासाठी त्यांना निवडून दिल्याचा विसर त्यांना पडला आहे. हिंदू युवकांनी राजकीय स्वार्थी, लबाड, ढोंगी नेत्यांच्या चिथावणीला बळी न पडता आपले शिक्षण, रोजगार याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने काळे यांनी केले आहे.