
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशोक चव्हाण यांच्या वडिलांच्या कामावर टीका करत आहेत. तरीही अशोक चव्हाण हे गप्प बसले आहेत. फडणवीस टीका करत असताना तुम्ही गप्प कसे बसलात? मनातली लाज फडणवीसांच्या चरणी गहाण ठेवलीय का? अशा तिखट शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक चव्हाणांवर हल्ला चढवला. सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करून चव्हाणांना चांगलेच फैलावर घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नांदेड येथील सभेत काँग्रेसच्या 70 वर्षांच्या कारभारावर टीका केली. मात्र, या टीकेवरून आता काँग्रेसने माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांना चांगलेच लक्ष्य केले आहे. 70 वर्षात काँग्रेसच्या काळात नांदेडचा विकास झाला नाही, नांदेडच्या राज्यकर्त्यांकडे नियोजन नव्हते, असे वक्तव्य केले. यावेळी तिथेच बसलेल्या अशोकरावांना हा स्वतःचा अपमान वाटला नाही का? स्वतःचा जाऊद्या, पण आपल्या वडिलांबद्दल कोणी बोललं तर कोणताही मुलगा हे कसं ऐपून घेईल? अशोकरावांना हा स्व. शंकरराव चव्हाण साहेबांचा अपमान वाटला नाही का? की आपण एवढी लाचारी पत्करलीय की वडिलांचा अपमानही तुम्हाला क्षुल्लक वाटतोय, अशी टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
नांदेड येथील इंदिरा गांधी मैदानावर नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. गेल्या 70 वर्षांत राज्यकर्त्यांना शहरांच्या विकासाचा विसर पडला होता. मात्र, 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना आणि अमृत योजनेच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी शहरांना दिला, असे फडणवीस म्हणाले होते. आता या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर देत थेट माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला आहे.
शंकरराव चव्हाण यांच्या कामाचा गर्व
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये आहेत. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे अखेरपर्यंत काँग्रेसमध्ये होते. आम्ही आजही गर्वाने सांगू शकतो की, शंकरराव चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर नांदेड जिह्याच्या विकासाला गती दिली आणि जिह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. त्यांच्या कामाचा आम्हाला आजही गर्व आहे, असे सपकाळ म्हणाले.




























































