बापरे! हे तर भयंकरच… बलात्काराचा उल्लेखच अहवालात नाही

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केला आणि अत्यंत क्रूरपणे तिची जीभ कापली, हाडे मोडली. परंतु पीडितेवर बलात्कार झाल्याचा उल्लेखच शवविच्छेदन अहवालात नाही असे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे सरकारचा भयंकर कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

सुरुवातीला पीडित तरुणीवर अलिगढ येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पिडीतेला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हालविण्यात आले. मंगळवारी पिडीतेचा मृत्यू झाला. पोलिसांनी जबरदस्तीने रातोरात पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. आता या प्रकरणाला आणखी भयंकर वळण लागले आहे.

कुटुंबियांचे काय आहे म्हणणे

14 सप्टेंबरला जनावरांसाठी चारा आणण्याकरिता त्यांची मुलगी शेतात गेली होती. तेथे चार तरुणांनी सामुहिक बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तिची जीभ छाटलेली होती. मानेवर गंभीर जखमा आणि मणका मोडलेला होता.

अहवालात काय आहे?

  • सफदरजंग रुग्णालयात पीडितेच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाले. या अहवालानुसार पीडितेचा गळा दाबण्यात आल्याच्या खुणा आहेत. मात्र, गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचा उल्लेख नाही. मणक्याला प्रॅक्चर झाले आणि त्यातून रक्तस्त्रव झाला, असे अहवालात म्हटले आहे.
  • सुरुवातीला पीडितेवर अलिगढ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यात गळय़ाला जखमा झाल्याचा उल्लेख आहे. तसेच बलात्कार करण्याचा केवळ प्रयत्न झाला, असे म्हटले आहे.

पोलीस म्हणतात…

  • रुग्णालयाच्या अहवालात बलात्कार झाल्याचा उल्लेख नाही असे जिल्हा पोलीस प्रमुख विक्रांत वीर यांनी सांगितले.
  • व्हिसेरा जपून ठेवण्यात आला आहे. एसआयटीकडे अहवाल दिला जाईल. व्हिसेराच्या तपासणी अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले.
  • दरम्यान, हाथरस पोलिसांनी पहिल्या एफआयआरमध्ये केवळ जीवे मारण्याचा प्रयत्न असा उल्लेख केला होता. मात्र, देशभर संतप्त प्रतिक्रियेनंतर सामूहिक बलात्काराचे कलम लावण्यात आले.
आपली प्रतिक्रिया द्या